नवी दिल्ली | वृत्तंस्था |
फ्रान्सच्या पॅरिसमध्ये झालेल्या वर्ल्ड कप तिरंदाजी स्पर्धेत सोनेरी कामगिरी करणार्या नवरा-बायकोच्या जोडीनं ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पदकाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. ही जोडी ऑलिम्पिकमध्ये एकत्र खेळताना दिसेल असे वाटत होते. पण भारतीय तिरंदाजी संघात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. दीपिका कुमारी आणि प्रविण जाधव ही जोडी मिश्र सांघिक प्रकारात मैदानात उतरली होती. अनुभवी दीपिका आणि युवा प्रविणने सुरुवात चांगली केली. पण त्यांना फायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. तिरंदाजीतील अखेरची आस आता पुरुष आणि महिला गटातील सिंगल्समधून आहे. अतनू दासने गुरुवारी क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीये. त्याने दक्षिण कोरियाच्या लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन असलेल्या ओ जिन येकला 6-5 असे पराभूत केले. पुरुष गटात 31 तारखेला अतनू दास आता जपानच्या फुरुकावा तकाहारु याच्यासोबत भिडणार आहे. दुसरीकडे त्याची पत्नी दीपिका कुमारी शुक्रवारी क्वार्टर फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरेल. तिचा सामना पेरोवा कसेनियासोबत होणार आहे.