पश्चिम बंगाल सरकारचं नवं विधेयक
| कोलकाता | वृत्तसंस्था |
पश्चिम बंगाल सरकारने महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसंच लैंगिक अत्याचार, शोषण आणि बलात्काराच्या घटनांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने नवं विधेयक आणलं आहे. या विधेयकातली महत्त्वाची तरतूद म्हणजे बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास आरोपीला फाशी दिली जाणार ही आहे. बलात्कार आणि शोषणाच्या घटनांच्या विरोधात हे विधेयक आणण्यात आलं होतं, हे विधेयक ममता सरकारने मंजूर केलं आहे. विधानसभेत हे विधेयक मांडण्यात आलं जे सगळ्याच आमदारांनी एकमुखाने मान्य केलं.
अपराजिता वुमन चाईल्ड बिल असं या विधेयकाचं (पश्चिम बंगाल गुन्हेगारी प्रतिबंध कायदा दुरुस्ती विधेयक 2024) नाव आहे. या विधेयकावर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. मागच्या महिन्यात 9 तारखेला आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी एका डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या घटनेने सगळा देश हादरला. या प्रकरणानंतर आता कायदे कठोर करण्याच्या दृष्टीने ममता सरकारने हे नवं विधेयक आणलं ज्या विधेयकाला आता मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.