रोहित्र बिघाडामुळे 27 तासांचा अंधार
। पनवेल । प्रतिनिधी ।
कामोठे उपनगरातील सुमारे 15 हजार नागरिकांना तब्बल 27 तास वीजपुरवठ्याविना राहावे लागले. यामुळे संतप्त रहिवाशांनी रात्री महावितरणच्या उपकेंद्र कार्यालयात धडक देत प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. 630 किलोव्होल्ट-अँपिअर क्षमतेच्या रोहित्रात बिघाड झाल्याने हा प्रकार घडल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. मात्र आधुनिक यंत्रणा असतानाही रोहित्र उपलब्ध करून देण्यासाठी लागलेल्या 27 तासांच्या विलंबासाठी कोणाला जबाबदार धरणार, असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत.
कामोठे सेक्टर 17 तसेच परिसरातील काही भागांचा वीजपुरवठा रात्री सुमारे 11 वाजता खंडित झाला. सुरुवातीला तांत्रिक बिघाडामुळे काही वेळात वीजपुरवठा पूर्ववत होईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र सकाळ झाली तरी वीज न आल्याने रहिवाशांनी महावितरणच्या उपकेंद्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने अनेक नागरिकांनी उपकेंद्र गाठले. उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती दिली. त्यानंतर नागरिक घरी परतले. मात्र रात्रीपर्यंतही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांनी पुन्हा उपकेंद्रात गर्दी केली. या काळात अनेक गृहनिर्माण संस्थांमधील पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला. पाणी उंच जलकुंभात चढविण्यासाठी लागणाऱ्या मोटारी बंद राहिल्याने नागरिकांना वीज आणि पाणी या दोन्ही मूलभूत सुविधांच्या समस्येला सामोरे जावे लागले. उन्हाचा तीव्र तडाखा असताना घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना विशेष त्रास सहन करावा लागला.
विजेचे बील भरले नाही तर लगेच वीजजोडणी कापता, मात्र वीज गुल झाल्यानंतर दुरूस्तीला विलंब का लावता, असा संतापजनक प्रश्न वीजग्राहक विचारत होते. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर महावितरणने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कामोठे पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली. महावितरणच्या अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 630 केव्हीए क्षमतेच्या रोहित्रात बिघाड झाल्याने त्याच्या दुरुस्तीला वेळ लागला. कामोठे परिसरात सुमारे 230 रोहित्र कार्यरत आहेत. वाढत्या वीजमागणीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त रोहित्रे उपलब्ध ठेवण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.






