। उरण । प्रतिनिधी ।
महजनको (एमएसईबी) राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा दि.19 ते 23 जानेवारी दरम्यान जीटीपीएस उरण प्लांट वसाहत येथे घेण्यात आली. या स्पर्धेसाठी महाजनकोच्या राज्यातील 11 विभागातील बुद्धिबळ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने नाशिक, नागपूर, चंद्रपूर, पुणे, भुसावळ, खापरखेडा, कोराडी, मुंबई आणि रायगड-उरण येथील पुरुष गटात 44 तर महिला गटात 10 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
ही संपूर्ण स्पर्धा क्लासिकल पद्धतीने खेळविण्यात आली. त्यात पुरुषांचे 7 राऊंड तर महिलांचे 4 राऊंड खेळविण्यात आले. या स्पर्धेतील पुरूष गटात पारस औष्णिक विद्युत केंद्राचे अनुप गावंडे व नाशिक औष्णिक विद्युत केंद्राचे विशाल आहेर यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तर, महिला गटात परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या शमीम शेख व भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रतिक्षा काळे यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
दरम्यान, या स्पर्धेचे उद्घाटन जीटीपीएस मुख्य अभियंता सुनील अव्हाड यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून सनियर नॅशनल ऑर्बिटर संदीप पाटील यांनी काम पाहिले. तर, उपपंच म्हणून आदित्य पाटील, अमर काळे व अश्विनी धोत्रे यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जीटीपीएस अभियंता सोमेश्वर सिंगर, दिपक पाटील, मोतीसागर सोनावणे, एसश्री पाटील आणि समीर घरत यांनी अथक परिश्रम घेतले होते.