25 वर्षांपासूनची परंपरा
| रोहा | प्रतिनिधी |
अखंड रायगडवासियांचे श्रद्धास्थान, रोहेकरांचे ग्रामदैवत पालखी सोहळा हा प्रथा, परंपरा पाळत साजरा होत असतो. रोह्यातील प्रत्येक घराणे, समाज यांना पालखी काळात असलेला मान सन्मान राखत देवळातून पालखी प्रस्थान होते. आता या सोहळ्यात अशोक धोत्रे मित्र मंडळाची महाप्रसाद सेवाही एका परंपरेकडे वाटचाल करत आहे. अंत्यत भक्तिमय व शिस्तमय पद्धतीने हा महाप्रसाद देण्यात येतो.
25 वर्षांपूर्वी भाटे सार्वजनिक वाचनालय सभागृह या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पालखीच्या वेळी बाहेर गावाहून बंदोबस्ता करता आलेले पोलीस, खालू बाजा, बेंजो, ढोल ताशे पथक, पालखी सेवेकरी यांचेसाठी सुरु केलेली ही सेवा आता महाराजांचा महाप्रसाद म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. मात्र आजवर जो येईल त्याला दोन घास देण्यात धावीर महाराजांचे आशीर्वादाने देण्यात कधीही खंड पडला नाही. यापुढेही ही सेवा अशीच निरंतर सुरु ठेवू, असा विश्वास अशोक धोत्रे यांनी व्यक्त केला. तसेच, आता या कार्यात माझ्या मुलांसह शहरातील युवा पिढी सक्रिय होत भक्तांची सेवा करत असल्याचे समाधान बघायला मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.







