सुमारे अडीच हेक्टर क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता
। अलिबाग । प्रतिनिधी।
अनेक जलचर प्राणी, खेकडे, मासे, झिंगा या जीवांचे आश्रय स्थान असणारे रेवदंडा परिसरातील कांदळवन आता नष्ट होणार आहे. प्रस्तावित रेवस-रेड्डी प्रकल्पासाठी उभारण्यात येणार्या पुलाच्या कामासाठी कांदळवनाचे सुमारे अडीच हेक्टर क्षेत्र नेस्तनाबूत होणार आहे. त्यामुळे समुद्रातील जीवांबरोबरच मासेमारीचा व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मच्छीमारांचे कायमस्वरुपी रोजगाराचे साधन बंद होणार असल्याचे मच्छिमारांकडून सांगण्यात आले.

सध्या औद्योगिकरण वाढत आहे. पर्यटनामुळे कोकणातील वर्दळ प्रचंड वाढली आहे. रायगडसह कोकणात पर्यटनासाठी जाताना वेळेवर पोहचता यावे, यासाठी रेवस ते रेड्डी हा सागरी महामार्ग विकसित केला जाणार आहे. अलिबाग तालुक्यातील रेवस ते सिंधूदूर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंत असणारा हा रस्ता 498 किलोमीटरचा आहे. या महामार्गाला रायगडसह रत्नागिरी व सिंधुदूर्ग हे तीन जिल्हे जोडले जाणार आहेत. या महामार्गामध्ये वेगवेगळ्या नवीन पुलांची उभारणी केली जाणार आहे. त्यामध्ये रेवदंडा येथील साळाव हा पुल असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत त्याचे काम केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रेवदंडा- साळाव नवीन पुल उभारण्यात येणार आहे. मात्र रेवदंडा बंदरालगत असलेले कांदळवनाचे सुमारे अडीच हेक्टर क्षेत्र नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यासाठीच्या हालचालींना वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे. त्या कांदळवनात लाल झेंडे लावण्यापासून पुलासाठी कांदळवनाची जमीन किती घ्यायची याचे मोजमाप गेल्या काही दिवसांपासून सुरु झाले आहे. या पुलामुळे कांदळवनात आश्रय घेणारे खेकडे, झिंगा व इतर जलचर प्राणी नष्ट होण्याची भिती आहे. तसेच मच्छीमारांवरही मोठे संकट उभे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी यामुळे मच्छीमारांचा रोजगार जाणार असल्याचे तेथील मच्छीमारांकडून सांगण्यात आले आहे.
तालुक्यातील रेवदंडा-साळाव पूल जुना झाल्याने त्याची अनेकदा डागडुजीसुद्धा करण्यात आली आहे. दरम्यान, या पुलाला पर्यायी म्हणून नवीन पुलाची उभारणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात कांदळवनाची कत्तल करण्यात येणार आहे. जुन्या पुलाच्या बाजूलाच नवीन पूल बांधण्यात येतो. परंतु, साळाव पुलापासून जवळपास तीनशे मीटर आत जेट्टीच्या बाजूला हा पूल उभारला जाणार आहे. रेवदंडा बायपासच्या बाजूचे कांदळवन यामुळे नष्ट होणार आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणावर चालविली जाणारी कुर्हाड स्थानिकांसह पर्यावरणप्रेमींना मान्य नसून, त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
नेमके पर्यावरणाचे किती नुकसान होणार आहे, याबाबत मूल्यमापन करणार्या संस्था असून, त्यांच्याकडून आधी मूल्यमापन करुन घेणे आवश्यक आहे. आपल्या डोळ्यांनी दिसणारे आणि न दिसणारे जे सूक्ष्म जीव आहेत, त्यांचा अधिवास कांदळवन तोडल्याने नष्ट होणार आहे. याबाबतचा अभ्यास करणार्या संस्था असून, त्यांच्याकडून अहवाल मागविला जातो. त्या संस्थांना दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतरच या परिसराचे चित्र स्पष्ट होते. परंतु, सरकार हातघाईवर येऊन जर अशा प्रकारे विकासाच्या नावाखाली कांदळवनांची तोड करणार असेल, तर त्याला स्थानिकांनी जाब विचारणे गरजेचे आहे. विकास हवाय, पण स्थानिकांना समूळ नष्ट करणारा असा विकास नकोय, हे ठामपणे शासनापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कांदळवन संरक्षण काळाची गरज
पर्यावरणाचा समतोल, सागरी संपत्तीचे जतन करण्यासाठी कांदळवन संरक्षण ही काळाची गरज आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कांदळवनाची मदत होते. समुद्राकडून वाहत आलेला गाळ कांदळवनाच्या फांद्या व मुळांपामुळे अडवला जातो. वादळी वारे व इतर आपत्तीच्या काळात नैसर्गिक संरक्षण भिंतीचे काम कांदळवन करतात.
कांदळवन पर्यावरणासाठी फायदेशीर
कांदळवन ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणार्या भागात वाढते. समुद्र लाटांबरोबर होणारी जमिनीची धूप ही कांदळवने थांबवते. कांदळवनामुळे समुद्रातील अन्नसाखळी टिकून राहते. त्सुनामीचा तडाखाही सक्षमपणे थोपविण्यास कांदळवनांची मदत होते.
शासनाकडूनच पर्यावरणाचा होतोय र्हास
साळाव जुन्या पुलाच्या लगतच समुद्रात मित्तल कंपनीचे स्वयंचलित यंत्र आहे. जून्या पुलाच्या बाजूला नवीन पुल बांधल्यास कंपनीचे यंत्र तेथून हालविण्याची शक्यता आहे. त्या यंत्राला वाचवण्यासाठी शासनाने पर्यावरणाचाच र्हास करण्याचा डाव आखला आहे.
केंद्राकडून परवानगी घेणार
रेवस -रेड्डी प्रकल्पामध्ये रेवदंडा-साळाव पुल उभा राहणार आहे. या पुलासाठी तेथील कांदळवनाचे सुमारे अडीच हेक्टर क्षेत्र जाण्याची शक्यता आहे. केंद्राकडून परवानगी घेतल्यावर पुढील कार्यवाही सुरु होणार आहे.
रेवस- रेड्डी सागरी महामार्गामध्ये नवीन पुल बांधले जाणार आहे. कांदळवनाचे नुकसान होण्याबरोबरच तेथील मच्छीमारांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे. मच्छीमारांचे उदरनिर्वाहाचे कायमस्वरुपी साधन बंद होईल. शासनाने प्रकल्प उभारताना स्थानिक मच्छीमारांना विश्वासात घेऊनच काम करावे. तसेच त्यांना योग्य तो मोबदला द्यावा.
सुधाकर गुंडा, चेअरमन
दर्यातरंग मच्छीमार सोसायटी रेवदंडा
साळाव पुलाच्या बाजूला नवीन पुल बांधण्यासाठी कांदळवनाचे क्षेत्र जाण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाकडून त्याची पाहणी करण्यात आली आहे. परवानगी घेतल्याशिवाय कांदळवन तोडू दिले जाणार नाही. कांदळवन तोडताना निकष देण्यात आले आहेत.
समीर शिंदे,
वन परिक्षेत्र अधिकारी, कांदळवन विभाग