दिखाव्याच्या लग्नांनी कुटुंबं कर्जाच्या खाईत
। उरण । प्रतिनिधी ।
एकेकाळी साधेपणा, संस्कार आणि शास्त्रोक्त परंपरेचा मान राखत पार पडणारे विवाहसोहळे आज दिखाव्याच्या अंध स्पर्धेत भरकटले असून, या स्पर्धेने समाजातील अनेक कुटुंबांना अक्षरशः कर्जाच्या दलदलीत लोटले आहे. “आपलं लग्न भारी दिसलं पाहिजे” या हव्यासापोटी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असून, त्याची किंमत मात्र लग्नानंतर संपूर्ण कुटुंबाला चुकवावी लागत आहे.
आजच्या लग्नांमध्ये सजावट, महागडी मेकअप व्यवस्था, थीम बेस्ड कार्यक्रम, प्री-वेडिंग फोटोशूट, संगीत समारंभ, भपकेबाज रिसेप्शन आणि देवाणघेवाणीच्या नावाखाली उधळपट्टीचा अक्षरशः पाऊस पडतो. या सर्व गोष्टींसाठी अनेक कुटुंबे कर्ज, सोने तारण आणि वैयक्तिक कर्जाचा आधार घेतात, मात्र लग्नानंतर त्याच कर्जाचा फास गळ्याला आवळतो.
नव्याने संसार सुरू करणाऱ्या तरुण जोडप्याच्या आयुष्याची सुरुवातच कर्जाच्या ओझ्याखाली होत असल्याने घरात तणाव, वाद आणि मानसिक त्रास वाढताना दिसत आहे. काही कुटुंबे वर्षानुवर्षे या कर्जाच्या विळख्यात अडकून पडतात. ही परिस्थिती समाजासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या मते, शास्त्रोक्त विवाहपद्धतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. मुहूर्ताची पर्वा न करता फोटोशूटसाठी वेळ काढला जातो, विधी उशिरा पार पडतात, तर काही ठिकाणी लग्नाचे कार्यक्रम पहाटेपर्यंत चालतात. पारंपरिक तिन्ही सांजेला संपणारे लग्न आज रात्रीभर चालणाऱ्या कार्यक्रमात बदलले आहे. ही केवळ परंपरेची पायमल्ली नसून संस्कृतीवरच आघात असल्याचे मत व्यक्त होत आहे.
टिळक, मेहंदी, संगीत, महागड्या साड्या-लेहंगे, रिसेप्शन आणि विविध दिखाऊ कार्यक्रमांमुळे लग्नाचा खर्च अनाठायीपणे वाढतो आहे. अनेक कुटुंबे सामाजिक दडपणामुळे या स्पर्धेत उतरतात, तर काहीजण प्रतिष्ठेच्या नावाखाली स्वतःच कर्जाच्या खाईत उडी घेतात. “दिसणं म्हणजे प्रतिष्ठा” ही चुकीची मानसिकता समाजात घट्ट रुजत चालली आहे.दरम्यान, सुजाण नागरिकांकडून साधेपणाने लग्न करण्याचे आवाहन केले जात आहे.
पत्रिका छापण्याऐवजी डिजिटल निमंत्रण, मोजक्या पाहुण्यांची उपस्थिती, आहेर प्रथा टाळणे, खर्चिक कार्यक्रमांना फाटा देणे आणि कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेनुसार विवाह पार पाडणे या उपायांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.
“एक दिवसाच्या थाटासाठी आयुष्यभर कर्ज फेडण्यापेक्षा, त्या पैशातून मुलामुलींच्या भविष्यासाठी बचत करा,” असा सल्लाही जाणकारांकडून दिला जात आहे. शेती विकून, कर्ज काढून केलेले भपकेबाज लग्न शेवटी कुटुंबालाच पोखरते, ही वस्तुस्थिती आता समाजाने स्वीकारण्याची वेळ आली आहे. समाजातील तरुणांनी आणि वधू-वरांनी पुढाकार घेत अनिष्ट प्रथा मोडीत काढल्या, तरच या दिखाव्याच्या दुष्टचक्रातून समाज बाहेर पडू शकतो. चार दिवस लोक बोलतील, पण आयुष्यभर कर्जात जगण्यापेक्षा साधेपणाने जगणे केव्हाही श्रेष्ठ, हे वास्तव आता समजून घेणे गरजेचे आहे.







