बोर्लीपंचतनमध्ये खड्डे बुजवायला तात्पुरती मलमपट्टी
| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहरातून जाणार्या श्रीवर्धन रस्त्यावरील सध्या खड्डे बुजवण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. मात्र, हे खड्डे बुजवताना योग्य प्रमाणात डांबर आणि खडी वापरली जात नसल्याने तात्पुरती मलमपट्टी केल्यासारखे खड्डे दिसत आहेत. त्यामुळे वाहनचालक याबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत.
आदगाव ते शिस्ते तसेच बोर्लीपंचतन शहरातून श्रीवर्धनकडे जाणार्या रस्त्यावर दोन दिवसात बुजवण्यात आलेल्या खड्ड्यातील खडी चार तासांनतर खड्ड्याबाहेर आलेली दिसत असल्याने खड्ड्यांची दुरुस्ती म्हणजे मलमपट्टीचेच काम होत असल्याचे दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभागामार्फत हे काम होत आहे. मात्र, कंत्राटदार करत असलेल्या अशा कामांकडे विभागाचा कानाडोळा होत असल्यामुळे वाहनचालकांमधून नाराजी होत आहे. त्यामुळे भविष्यात होणार्या अपघाताला कोण जबाबदार राहणार? असा प्रश्न वाहनचालकांमधून विचारण्यात येत आहे. खड्डे बुजवल्यानंतर रोलर न फिरवल्याने वरवरची खड़ी वाहने जाउन रस्त्यालगत जमलेली पहायला मिळते. यात ’डांबर कमी आणि खडी जास्त’ असा प्रकार होत असल्याचे अनेकांच्या निदर्शनास येत आहे.
धुळीचा त्रास पुन्हा वाढला
एका बाजूला शासनाने प्रदूषणाबाबत गांभीर्याने पावले उचललेली दिसत आहेत. मात्र, खड्डे बुजवण्याचा अशा अजब प्रकाराने मोठ्या प्रमाणात दुर्लंक्ष केले जात आहे. या प्रक्रियेत खड्ड्यांना खडी डांबरचे पक्के पॅच न मारल्याने संपूर्ण रस्त्यावर खडी पसरून मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट तयार होतात. त्यामुळे या रस्त्याशेजारून जाणार्यांना याचा त्रास होतो. पण, याची काळजी घेतली जात नाही. त्यानंतर कामगार इतक्या वेगाने खड्डे बुजवतात. या ठिकाणी ठेकेदार किंवा व्यवस्थापक हजर नसल्याचे आढळतात.