| पनवेल | वार्ताहर |
दोन धर्मियांमध्ये जातीय तेढ निर्माण करुन धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करुन तातडीने अटक करण्याची मागणी मुस्लिम विकास समितीच्या वतीने पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी पनवेलमधील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. राजकीय मतभेद दूर ठेवत सर्वांनी एकत्र येऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांनी सप्ताहादरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जन समुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरुची प्रतिमा मलीन होईल असे जाणीवपूर्वक प्रवचन केले. या वक्तव्यामुळे व अशा प्रकारच्या प्रवचनामुळे हिंदू-मुस्लिम या दोन समाजामध्ये मने कलुषित करुन जातीय तणाव, धार्मिक द्वेष पसरवण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा रामगिरी महाराजाकडून मुस्लिम धर्मियांविरोधात जाणुनबुजून धार्मिक भावना दुखवून जातीय दंगल घडविण्याच्या इराद्यात व्यक्तव्य करुन घेण्यात येत असल्याचे मत डॉ.मुनीर तांबोळी यांनी यावेळी व्यक्त केले.
मुस्लिम समाजात अनेक ठिकाणी इज्तेमा होतात. त्यामध्ये फक्त इस्लाम विषयी प्रवचन देऊन माणसाने समाजात माणूस म्हणुन कसे जगावे याबाबत शिकवण दिली जाते. कोणत्याही धर्म व जाती विरोधात कोणत्याही प्रकारचे वक्तव्ये केली जात नाही. रामगिरी महाराजाने केलेल्या वक्तव्यामुळे समाज जीवनातील एकोपा, सामाजिक बंधूभाव धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.
सध्या गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. पाठोपाठ महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. त्यामुळे आपण समस्येचे गांभीर्य ओळखून रामगिरी गुरु नारायण गिरी महाराजांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू असे निवेदन देण्यात आले.