। पाली/बेणसे । वार्ताहर ।
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 11 व्या स्मृतिदिनानिमीत्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पनवेल शाखेतर्फे आयोजित विवेक जागर करंडक पथनाट्य स्पर्धेत नाट्यरूची कलामंच चेंबूर प्रथम क्रमांकाने विजेते ठरले आहे. तर, परिवर्तन नाट्य कला संस्था खोपोली यांनी द्वितीय क्रमांक व कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन चर्चगेट यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. विजेत्यांना सन्मानचिन्ह, रोख रक्कम, पुस्तक प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत अंतिम फेरीत सादरीकरणासाठी 20 संघ होते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या 20 ऑगस्ट 2013 रोजी करण्यात आली होती. त्याचा निषेध करतानाच समितीने ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ हे अभियान सुरू केले. तरुणाईत विवेकी विचारांचा जागर व्हावा म्हणून पनवेल शाखा गेली सहा वर्षे ही पथनाट्य स्पर्धा भरवत आहे. यावर्षी स्पर्धेचा विषय ‘हाताची घडी तोंडावर बोट’ हा होता. ही स्पर्धा रविवारी (दि.18) पनवेलच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे पार पडली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रशांत जोशी, किरण पवार, रसिया पडळकर यांनी काम पाहिले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रियांका तुपे या उपस्थित होत्या. स्पर्धेचे उद्घाटन सतीश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी महा. अंनिस राज्य महिला कार्यवाह आरती नाईक तसेच राज्य युवा सहभाग कार्यवाह प्रियांका खेडेकर, एपीआय राजन ताटे, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप गायकवाड हे उपस्थित होते.