| माणगाव | प्रतिनिधी |
एकात्मिक बालविकास सेवा योजना माणगाव अंतर्गत बीट-इंदापूर-1 यांच्यामार्फत इंदापूर येथे आठवा राष्ट्रीय पोषण माह सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. पोषण माह सप्ताह अंतर्गत तळाशेतमधील विठ्ठल-रखुमाई मंदिर ते बसस्थानक या मार्गावर महिला, किशोरवयीन मुली, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शालेय विद्यार्थी यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. यावेळी फळे, फुले, पालेभाज्या यांची सजावट केलेली पोषण पालखी घेऊन रॅली काढण्यात आली. ढोल-ताशाच्या गजरात निघालेल्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
इंदापूर बसस्थानकात यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस, बालकांच्या माता पालक यांनी प्रधानमंत्री मातृत्व वंदन व लेक लाडकी योजनेवर आधारीत अतिशय प्रभावी पथनाट्य सादर करुन जनजागृती केली. तळाशेत-गौळवाडी अंगणवाडीतील चिमुकल्या बालकांनी सफरचंद, शेवगा, संत्री, भेंडी, पपई, कलिंगड यांची वेशभूषा परिधान करुन फळे व पालेभाज्यांचे महत्व विषद केले. पोषण माह अंतर्गत विविध पथनाट्य सादर करुन नागरीकांची मने जिंकली. पुढच्या सत्रात पोषण माह, कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी आहार प्रात्यक्षिकांची मांडणी करुन सर्व किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा माता यांना आहाराचे महत्व स्पष्ट केले. तसेच, पथनाट्यातूनही आहाराचे महत्व अधोरेखित केले.







