। अलिबाग । नेहा कवळे ।
रायगडात एसटी कर्मचार्यांचा संप सुरूच असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. संप कधी संपेल, याबाबत अनिश्चितता आहे. संपामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून एसटी महामंडळालाही मोठा आर्थिक फटका बसत आहे. शिवाय इको, मिनीडोअर आणि रिक्षा चालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसुली करून सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. अलिबाग आगारातील बस 8 नोव्हेंबरपासून बंद आहेत. त्यामुळे एसटीच्या मार्गावर इको, खासगी रिक्षा व मिनीडोअरचालकांनी आपले बस्तान बसवले आहे.
प्रशासनाचा कुठलाही अंकुश नसल्यामुळे त्यांच्याकडून मनमानी भाडे आकारून प्रवाशांची लूट करण्यात येत आहे. दळणवळणाचे दुसरे कुठले साधन नसल्यामुळे अडीच महिन्यांपासून सर्वसामान्य प्रवासी भरडला जात आहे. तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे ग्रामीण भागातून अलिबाग शहरात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते. यामध्ये नोकरदार, विद्यार्थी व वैद्यकीय उपचार घेण्यासाठी येणार्यांची संख्या मोठी आहे. परंतु एसटी बंद असल्यामुळे ग्रामीण प्रवाशांना मिनीडोअर किंवा रिक्षाने प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही. याचाच फायदा घेत मनमानी भाडे आकारले जाते. त्यामुळे लालपरी लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी अपेक्षा प्रवाशांची आहे. अनेकांना पर्याय नसल्याने त्यांनी खासगी वाहतुकीचा आधार घेतला आहे.
याचा मोठा फटका अलिबाग-पनवेल सेवेवर झाला आहे. सर्व प्रशासकीय कार्यालये अलिबागमध्ये आहेत. त्यामुळे पनवेल परिसरातील अनेक नागरिकांना अलिबागला प्रशासकीय कामासाठी जावे लागत आहे. एसटी बंद असल्यामुळे अलिबाग-पनवेल खासगी वाहतूकदारांनी भाडे दुपटीने वाढल्यामुळे नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागतो. इंधन दरवाढीमुळे भाड्यात वाढ संधीचा गैरफायदा घेत नसून सीएनजी गॅस व डिझेलच्या किमती वाढल्यामुळे नाइलाजास्तव प्रवासी भाड्यात वाढ करावी लागली.
बाजारपेठेतील सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे भाडे वाढविल्याचे काही इको चालक, मिनिडोअर चालक, रिक्षाचालकांनी सांगितले. स्वतःचे वाहन नसल्यामुळे एसटी प्रवासासाठी महत्त्वाची आहे. एसटीचे भाडेही परवडणारे आहे. परंतु कित्येक दिवसापासून एसटी बंद असल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. – अभय मढवी, प्रवासी, आक्षी ग्रामस्थ







