| अलिबाग | प्रतिनिधी |
डॉ. भास्कर धाटावकर लिखित ‘मी आणि माझे कुटुंबीय’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि. 12) सायंकाळी प्रा. शाम जोगळेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला चंद्रशेखर वागळे, अंनिसच्या अलिबाग तालुका अध्यक्षा शुभांगी जोगळेकर, माजी सरपंच मोहन धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. रामराज पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास प्रतिसाद दिला. सर्व मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ॲड. मयूर धाटावकर, ॲड. विनायक धाटावकर आणि प्रकाश धाटावकर यांनी मनोगत व्यक्त केले. पुस्तक लेखनाची प्रेरणा सांगताना डॉ. भास्कर धाटावकर यांनी अमेरिकेतील शिकागो येथे वास्तव्यास असलेल्या राहुल याने ‘वंशवेल’ लिहिण्यास प्रवृत्त केल्याचे नमूद केले. धाटावकर कुटुंबाचे मूळ गाव रोहा तालुक्यातील धाटाव असून, 1883 मध्ये हे कुटुंब रामराज येथे स्थलांतरित झाले. त्यानंतरच्या 142 वर्षांच्या इतिहासाचा सविस्तर आढावा या पुस्तकात छायाचित्रांसह मांडण्यात आला आहे.
चंद्रशेखर वागळे यांनी धाटावकर यांच्या जडणघडणी व व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला, तर पत्रकार मिलिंद अष्टिवकर यांनीही आपले विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात प्रा. शाम जोगळेकर यांनी डॉ. धाटावकर यांच्या लेखनकार्याबरोबरच पुराभिलेख विभागातील त्यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर पाटील यांनी केले, तर प्रवीण धाटावकर यांनी आभार प्रदर्शन केले.







