| तेलंगणा | वृत्तसंस्था |
तेलंगणातील वारंगल-मामुनुरू रोडवरील भारत पेट्रोल पंपाजवळ लॉरी आणि दोन ऑटोरिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका मुलासह सात जण ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. रेल्वे रुळाच्या लोखंडी रॉडने भरलेल्या एका ट्रकने दोन ऑटोरिक्षांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. लोखंडी रॉड ऑटोरिक्षावर पडले आणि सात जणांचा जागीच मृत्यू झाला, ज्यामध्ये चार महिला आणि एक बालक आहे. पोलिसांनी जखमींना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वारंगल उपनगरातील खम्मम दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर मामुनूरजवळ भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. चालक मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवत होता, हे या अपघाताचे कारण असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. त्याने भरधाव वेगात लॉरी चालवली आणि एक भीषण अपघात झाला. हा अपघात वारंगलच्या मामुनुर या उपनगराजवळ घडला. अचानक ब्रेक लागल्याने लॉरी पलटी झाली. लॉरीतील लोखंडी रॉड ऑटोवर पडले. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजण ऑटोमधून जात असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, जिल्हाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य केले. राष्ट्रीय महामार्गावर पडलेला लोखंडी रॉड जड क्रेनच्या साहाय्याने हटवून तेथून लॉरी हटवण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.