सुरक्षारक्षक मंडळाने दिले नियुक्तीचे पत्र
। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
गेल्या सहा ते सात दिवसापासून सुरक्षारक्षकाने केलेल्या आमरण उपोषणाला यश आले असून रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाने या सुरक्षारक्षकाला पुन्हा त्याच ठिकाणी नियुक्तीचे पत्र दिले आहे. मात्र या निमित्ताने सुरक्षारक्षक मंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.
तळोजा येथील इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड या ठिकाणी वृषाल रवींद्र पाटील हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. मात्र, त्याला रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने अचानक प्रतीक्षा यादीवर ठेवल्याने वृषाल पाटील याने 25 फेब्रुवारीपासून मंडळाच्या कार्यालयाजवळ आमरण उपोषणाला सुरुवात केली. तब्बल सहा ते सात दिवसानंतर रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाला जाग आली आणि त्यांनी 3 मार्च रोजी सुरक्षारक्षक वृषाल पाटील यांच्या मागण्या पूर्ण केल्याचे पत्र दिले आहे. यावेळी आस्थापनेकडून वेतन प्राप्त झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत वेतन अदा करण्यात येईल आणि त्याकरता मंडळ स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. तसेच, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन तळोजा या आस्थापनेवर अलिबाग तालुका येथे आस्थापनेत जागा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत तळोजा येथील आस्थापनेत नोकरी करण्यास मंडळाने परवानगी दिली आहे. तसेच, अलिबाग तालुका येथे प्रतीक्षा यादीवरील ज्येष्ठतेनुसार निवडण्यासाठी प्राधान्याने पाठवण्यात येईल. याबाबत मंडळ स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे सुरक्षारक्षक मंडळाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.