नवनिर्माण युवा मंडळचा स्तुत्य उपक्रम; डेरवण रक्तपेढीला 21 रक्त बॉटल प्रदान
| चिपळूण । प्रतिनिधी ।
नवनिर्माण युवा मंडळ डिंगणकरवाडी बामणोली यांच्या वतीने 5 मे रोजी श्री चंडकाई वाघजाई ग्रामदेवता मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातच्या श्री स्वामी समर्थ रक्तपेढीने सहकार्य केले. रक्तदान करीत या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. या रक्तदान शिबिरातून डेरवण रक्तपेढीला 21 रक्त बॉटल देण्यात आल्या.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. एखाद्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी त्याला तातडीच्या रक्त पुरवठाची गरज असताना रक्त मिळणे फार गरजेचे असते. यासाठीच अशा रक्तदान शिबिरातून विविध रक्तगटाच्या बॉटल्स संकलित केल्या जातात. विविध रक्त दाते पुढे येऊन आपले रक्त डोनेट करत असतात. हाच समाजोपयोगी हेतू डोळ्यासमोर ठेवून बामणोली येथील नवनिर्माण युवा मंडळ डिंगणकरवाडी या मंडळांनी श्री सत्यनारायण पूजेचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन केले होते. याला उत्तम प्रतिसाददेखील मिळाला.
नवनिर्माण यूवा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र डिंगणकर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी अतिशय मेहनत घेत या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये डेरवण रुग्णालयातील रक्तपेढीचे रवी अग्रवाल आणि त्यांची सर्व टीम यांनी उत्तम प्रकारे सहकार्य केले. शिबिरात एकूण 21 रक्तदात्यांनी स्वतःचे रक्तदान केले. त्यामुळे हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले. नवतरुण मित्र मंडळ डिंगणकरवाडी आणि मुंबई मंडळ यांनी सुद्धा या रक्तदान शिबिराला उत्तम प्रकारे सहकार्य करत यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
या सर्व रक्तदात्यांचा गौरव दिनांक 6 मे रोजी झालेल्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात करण्यात आला. नवनिर्माण युवा मंडळाने केलेल्या हा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला असून त्यांच्या सर्व टीमचे प्रत्यक्ष डेरवण वरून आलेल्या टीमने सुद्धा कौतुक केले आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी टाकलेले पाऊल असेच पुढे चालू ठेवा असा सल्लासुद्धा रवी अग्रवाल यांनी दिला आहे. या शिबिराला सरपंच सुदेश गमरे, नवतरुण मित्र मंडळ डिंगणकर वाडी मंडळाचे अध्यक्ष राजाराम घाणेकर, मुंबई मंडळाचे सचिव शशिकांत तंबिटकर, सिताराम कुळे, सर्व पदाधिकारी आणि महिला मंडळ उपस्थित होते.
रक्तदात्यांना दिले नारळाचे रोप
समाजातील गरजू रुग्णांना निश्चितच या रक्तदात्यांनी दिलेल्या रक्ताचा उपयोग होणार आहे. या सर्व रक्तदात्यांना नवनिर्माण युवा मंडळाच्यावतीने एक नारळाचे रोप देण्यात आले. त्याचबरोबर वालावलकर रुग्णालयाच्यावतीने रक्तदान केल्याबद्दल कार्ड आणि प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले.