। पनवेल । वार्ताहर ।
दोन वर्षाच्या कोरोना महामारीत स्थगित असलेली अमरनाथ यात्रा यंदा 30 जून रोजी प्रारंभ होत असुन अमरनाथ श्राईन बोर्ड व स्थानिक प्राशासन यात्रा सुरळीत व्हावी म्हणून जय्यत तयारीत आहेत. पहिल्या दिवशी बाबा बर्फानीचे दर्शन घेण्याची परंपरा मंडळ यंदाही अबाधित राखत असुन मंडळाच्या परंपरेनुसार पनवेलमधील विरूपाक्ष महादेव मंदिरात दर्शन घेऊन अमरनाथ यात्रा व सर्व यात्रेकरूंच्या सफलतेची प्रार्थना करीत आशिर्वाद घेतला.
एकूण 36 जण या पहिल्या जत्त्यात सहभागी झाले असून मंगळवार दिनांक 28 जुन रोजी विमानाने श्रीनगर करीत मुक्काम बालटाल येथे तंबुत असणार आहे. 29 जुन संपूर्ण विश्रांती दिवस असुन 30 जून रोजी हर हर महादेवचा गजर करीत बालटाल ते पवित्र गुफां हा 14 कि. मी. चा खडतर प्रवास दर्याखोर्यातून, बर्फाळ प्रदेशातून होणार आहे. लहरी हवामानाचा सामना करीत बाबा बर्फानीचे पवित्र दर्शन घेत मंडळ आपली 27 वर्षांची परंपरा पुर्ण करण्यास आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशिर्वाद द्यावेत असे आवाहन श्री अमरनाथ सेवा मंडळ, पनवेलचे संस्थापक अध्यक्ष सुनील अचोळकर यांनी केले आहे.