| कर्जत | प्रतिनिधी |
गेल्या काही महिन्यांपासून कर्जत शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात केल्या गेल्या आहेत. नानामास्तर नगर, गुरू नगर परिसरात चोरट्यांची वर्दळ वाढली असल्याचे सीसीटीव्हीमधून समजून आली. कर्जत पोलीस ठाण्यात मनुष्यबळ कमी असल्याने पोलिसांना चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या मर्यादा आहेत. या पार्श्वभूमीवर कर्जत पोलीस ठाण्याकडून जनजागृती करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवून पोलिसांसोबत सकारात्मक चर्चा केली.
नानामास्तर नगरमधील श्री सिद्धिविनायक मंदिरात सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कर्जत पोलीस ठाण्याचे आर.बी. रसेडे, संतोष साळुंखे, पोलीस पाटील कृष्णा शिंदे, माजी नगरसेवक कृष्णा घाडगे, बाळू तवळे, रामदास ठाकरे, ज्ञानेश्वर भालिवडे, सोमनाथ पालकर, रमेश खैरे, भगवान शिंदे, ज्ञानेश्वर कर्णुक, केतन मोधळे, भीम मुसळे, राजाराम गायकवाड, मनोहर ढोले, जयदीप शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी रसेडे यांनी, पोलीस कर्मचारी कमी असल्याने थोडी अडचण होते. चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. पोलिसांच्या मनात आल्यास ते चोर पकडू शकतात. त्यांना चोर कोण आहेत ते माहीत असतं, असे माजी नगरसेवक घाडगे यांनी सांगितले. त्यावर रसेडे यांनी सराईत चोरांची यादी आमच्याकडे असते, मात्र आता नव्याने चोरांच्या टोळ्या झाल्याने त्यांची नावे पोलिसांकडे नाहीत, असे स्पष्ट केले.