| अलिबाग | प्रतिनिधी |
रोहा शहरात होणाऱ्या अनियमित इमारतीसाठी विकासकांच्या फायद्यासाठी शासनाचा निधी वापरण्याचे काम नगरपरिषदेकडून सुरु आहे. नकाशात वर्तविल्याप्रमाणे एमआयडीसीची जागा असताना शासकीय निधी वापरून विकासकाच्या भल्यासाठी नगरपरिषद स्लॅब टाकण्याचे काम करीत असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी केला आहे. याबाबत लेखी तक्रार करूनही नगरपरिषदने कार्यवाही केली नसल्याने येत्या 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. याबाबत शुक्रवारी त्यांनी कार्यालयात निवेदन दिले आहे. दरम्यान, संबंधित विकासकाने मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे.
रोहा शहरात मेसर्स अध्या बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्सलामार्फत 14 मजली इमारत बांधली जात आहे. या इमारतीच्या लगतच असलेल्या सातमुशी नाल्यावर स्लॅब टाकण्याचे काम नगरपरिषदेमार्फत केले जात आहे. विकासकाच्या भल्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी नगरपरिषद खर्च करीत असल्याचा जितेंद्र दिवेकर यांचा दावा आहे. सातमुशी गटाराची जागा एमआयडीसीच्या मालकीची आहे. या जागेशी रोहा नगरपरिषदेचा काहीही संबंध नसताना, विकासकाच्या भल्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी मंजूर करून बेकायदेशीररित्या शासनाच्या निधीचा अपव्य होत आहे. स्लॅबशेजारी तयार होत असलेल्या 14 मजली अनियमित इमारतीसाठी विकासकाच्या फायद्यासाठी निधी वापरण्याचे काम चालू असल्याचा आरोप दिवेकर यांनी केला आहे. मात्र, नगरपरिषद प्रशासनकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने दिवेकर यांनी अखेर न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली आहे. शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. याबाबत रोहा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक पंकज भुसे यांच्याशी संपर्क साधला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.
रोहा शहरामध्ये चौदा मजली इमारतीचे बांधकाम सुरू असलेली जागा मालकीची असून, नगरपरिषदेकडून परवानगी घेऊन बांधकाम चालू आहे. सर्व शासकीय यंत्रणांची परवानगी घेऊनच काम अधिकृत सुुरू आहे. सरकारी नियमाप्रमाणे आरक्षणदेखील काढण्यात आले आहे.
रवींद्र चाळके, विकासक