| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात राहणारे आदिवासी शेतकरी हे पावसाळ्यात भाताची शेतीबरोबरच भाजीपाला शेती करतात. मेहनत घेणारे आदिवासी लोक दरवर्षी माळरानावर शेती करतात आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न करतात.दरम्यान, 50 हून अधिक आदिवासी वाड्यांमधील शेतकरी भाजीपाला शेती करतात. सध्या भाजीपाल्याचे मळे फुलले असून, बाजारात आदिवासींचा भाजीपाला ग्राहकांना आकर्षित करीत आहे.
जून महिन्यात पावसाळा सुरू झाला की माळरानावर आदिवासी लोक भाजीपाला रोपे यांची लागवड करताना दिसतात.त्यामुळे कर्जत तालुक्यातील ओलमण, नांदगाव,खांडस, पाथरज, मोग्रज, वारे, साळोख, कळंब, पाषाणे, बोरिवली सुगवे या ग्रामपंचायतींमधील आदिवासी लोकांचे भाजीपाला मळे हे श्रावण महिना सुरू होत असताना फुललेले दिसून येत आहेत. त्यात भेंडी, वांगी, काकडी, शिराळे, घोसाळे, दुधी भोपळा, डांगर, कारले, मिरची या प्रकरची भाजी पिकविली जाते.
परंतु कोरोनामुळे अनेक बाजार बंद असल्याने मालाला हवा तितका उठाव नाही. त्यामुळे भाजीपाल्याची किंमत अतिशय कमी स्वरूपात मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. पनवेल, मुंबई सारख्या बाजारात पोहचण्यासाठी होणारा खर्च भाज्यांना योग्य तो मोबदला मिळत नसल्याने आर्थिक नुकसानीत हे शेतकरी आहेत. त्यामुळे कोरोनातून सावरण्यासाठी भाजीपाला शेती आर्थिक आधार देण्याऐवजी शेतकर्यांना आर्थिक संकटात टाकत आहे, असे चिंता शेतकरी दाजी गोरे, काशिनाथ गोरे, राम मेंगाळ, नवसू मेंगाळ, चंद्रकांत कांबडी, देहू कांबळी, जगदीश मेंगाळ, मारुती पारधी, दामू गोरे, लक्ष्मण मेंगाळ, राम खंडवी आदींनी व्यक्त केली.
स्थानिक बाजारपेठा फुलल्या
कर्जत तालुक्यातील किमान 500 शेतकरी भाजीपाला शेती करून आपल्या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण कल्याण, पनवेलसारखे बाजारात जाऊन योग्य मोबदला मिळत नसल्याने आता स्थानिक बाजारात हे आदिवासी लोक भाजीपाला विकण्यास बसू लागले आहेत. त्यातून शेती करण्यासाठी झालेला खर्च यातील मुद्दल उभी करण्याचा प्रयत्न सुरू असून, शेतकरी हिरवागार फ्रेश स्थानिक भाजीपाला बाजारात घेऊन येऊ लागल्याने ग्राहक खुश दिसत आहे.