| रोहा | प्रतिनिधी |
लोकसभागातून गावाचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन रोहा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांनी केले. रोहा तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. गावांच्या विकासात गावातील संसाधने, शासकीय योजना यांची सांगड घालून विकास आराखडे तयार करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आराखडे तयार करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी रोहा तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन रोहा पंस गटविकास अधिकारी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी गटविकास अधिकारी रोहा तसेच वरसे सरपंच नरेश पाटील, शेडसई सरपंच कडू, ग्रामसेवक संघटना अध्यक्ष दिपक चिपळूणकर तसेच तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक तसेच विस्तार अधिकारी महारुद्र फरतडे,तेजस दिवाडकर ,प्रविण प्रशिक्षक किरण शिरगावकर ,श्रीमती शेंबेकर यांच्यासह पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते. गावांचे विकास आराखडे तयार करताना गरीबीमुक्त आणि उपजीविका वृद्धीस पोषक तसेच आरोग्यदायी व बालस्नेही गाव,जलसमृद्ध ,स्वछ व हरित गाव, पायाभूत सुविधांनी परिपूर्ण असलेले सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गावांची निर्मिती करत असताना लिंग समभाव जपणारे सुशासन युक्त गावे तयार करणे ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
आराखडे तयार करण्यासाठी उपलब्ध माहिती कशा प्रकारे मिळू शकते. सहाय्यभूत यंत्रणा अशी विविध माहिती या शिबिरात देण्यात आली असून त्याचा आराखडे तयार करताना निश्चितच फायदा होईल असे उपस्थित सरपंच व ग्रामसेवक यांनी सांगितले. आपला गाव आपला विकास आराखडे तयार करण्यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचे देखील प्रशिक्षण घेण्यात येणार असून बालसभा,महिला सभा व ग्रामसभा देखील घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे