। वाघ्रण । वार्ताहर ।
वाघ्रण येथे श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिर्णोद्धार सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. दोन दिवस संपूर्ण गाव भक्तिमय झाल्याचे पहायला मिळाले. वाघ्रणचे प्रसिद्ध विधीज्ञ अॅड. गणेश गोविंद पाटील यांनी या भव्य आणि प्रेक्षणीय मंदिराचे स्व खर्चातून बांधकाम करून घेऊन ग्रामस्थांना दिले आहे.
या मंदिराच्या जिर्णोद्धार सोहळ्याला 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजता श्रींच्या मूर्तीला अभिषेक करून सुरुवात झाली. यावेळी सुभाष जोशी उपस्थित होते. त्या नंतर श्रींच्या मूर्ती व कळसाची ग्रामप्रदक्षिणा मंदीरापासून सुरू झाली. ही प्रदक्षिणा टाळ मृदुंग गजरात अंभग – भजनात तल्लीन भक्त ग्रामस्थ, महिला, युवक, मुली लहानगी सोबत निघाली. जय जय विठ्ठले रखूमाईचा जयघोष य वेळी सर्वांच्या मुखातून दुमदुमत होता. बेंजोच्या तालावर काहीजण नाचत होते तर मराठी शाळेची मुले लेझीम खेळत होती. डोक्यावर तुळसी वृंदावन घेऊन महिला भक्तीने आनंदाने नाचत होत्या. काही जणी फुगड्या भवर फेरा धरून नाचत होत्या. अॅड. गणेश पाटील यांनी महिला, पुरुष, भजन मंडळीना गणवेश भेट दिल्याने सगळीकडे एकच रंग दिसत होता. हि ग्रामप्रदक्षिणा संपूर्ण गावात फिरत असताना प्रत्येक घरातून महिला श्रींच्या मूर्तींचे पूजन करताना पहायला मिळत होते. संपूर्ण गावात प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा मंदिराकडे प्रस्थान झाले. दुपारी साडेतीन वाजता पुण्याह पूजन, मातृका पूजन, नवग्रह पूजन, वास्तुमंडळ पूजन, होम हवन जलाधिवास, धान्याधिवास आदी धार्मिक सोहळे झाले. तर रात्री 9 वाजता महाप्रसाद देण्यात आला. त्या नंतर 7 मार्चला सकाळी पूजन, होमहवन व मूर्ती स्थापना प्रतिष्ठापना झाली. महाआरती महाप्रसाद त्यानंतर रात्री भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्यात शास्त्र शुद्ध मंत्र पठण होमहवनसाठी पाच ब्राम्हण हजर होते. मंदीर दर्शनाला खुले केल्यावर दर्शनाला रांग लागली होती. अॅड. गणेश पाटील यांनी कोणतीही प्रसिद्धी मानपान न स्वीकारता केलेल्या या निस्वार्थ सेवेची चर्चा सोहळ्यात ऐकायला मिळाली.