| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नीट पेपर फुटीविरोधात तरुणांनी दिल्लीच्या संसद भवनमध्ये दाद मागण्याचा प्रयत्न केला. हा लढा देशाच्या भविष्यासाठी, न्याय हक्कासाठी, आपले हक्क रोखण्याविरोधातील होता. मात्र या सरकारने पोलीस बळाचा वापर करीत लाखो तरुणांवर अमानुषपणे लाठी हल्ला केला. ही घटना अतिशय निंदनीय आहे. तरुणांनो जागे, व्हा, रात्र वैऱ्याची आहे. संविधानावर आणि लोकशाहीवर घाला घालणाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. देशाचा कारभार सुशिक्षितांनाच हाती घ्यावा लागणार आहे, असे आवाहन शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी केले.
नीट परीक्षा झाल्याशिवाय वैद्यकिय क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी पात्र ठरवता येत नाही. 1 लाख 763 जागांसाठी 25 लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. नीट पेपर फुटीमुळे आज 25 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. पेपर फुटीमळे परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचे स्वप्न भंगल्याची घणाघाती टीका ॲड. मानसी म्हात्रे यांनी केली.
लडाख येथील आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या वांगचुक यांचे वारसदार सोनम वांगचुक एक थोर वैज्ञानिक, पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत.
विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी दिल्लीमधील जंतरमंतरमध्ये उपोषण केले. नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरु केले. मात्र, त्यांनाच हिनतेची वागणुक या सरकारने दिली आहे. त्यांचे आंदोलन दडपण्यासाठी हुकूमशाहीचा अवलंब करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा मागण्यासाठी त्यांनी गेली वीस दिवस उपोषण केले. मात्र, या कालावधीत त्यांच्याकडे साधे कोणी फिरकलेही नाही. शिक्षणमंत्र्यांना का पाठीशी घातले जात आहे, असा संतप्त सवाल मानसी म्हात्रे यांनी केला. तसेच, काल-परवा झालेल्या आंदोलनात तरुणांसह तरुणींनीही स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतला होता. फक्त न्याय मिळावा, म्हणून त्यांनी संविधान मार्गाने लढा केला होता, काय दोष होता त्यांचा? असा संतापजनक सवालही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील अलिबागच्या भूमीत दिल्लीचे तख्त राखण्याचे सामर्थ्य आहे. शेतकरी कामगार पक्ष कायम तरुणांच्या पाठीशी आहे. वेळप्रसंगी दिल्लीत जाऊन अलिबागची ताकद दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा, असे म्हणत मानसी म्हात्रे यांनी रायगड जिल्हा परिषद शाळांची अवस्था, शैक्षणिक पद्धती, शिक्षकांकडे असेलेले अशैक्षणिक काम या मुद्द्यावर सवाल उपस्थित करीत तरुणांचे भवितव्य घडविण्यासाठी शिक्षण धोरण बदलण्याची गरज आहे. त्यासाठी एकजुटीने एकत्र या, असे आवाहनही त्यांनी केले.






