सोसायट्यांमध्ये वाढल्या टँकरच्या फेऱ्या; दरमहा लाखो रुपयांचा भुर्दंड
| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली नगरपालिकेने शहरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गृहनिर्माण सोसायट्या आणि सामान्य नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. नगरपालिकेचा अपुरा पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना दरमहा हजारो ते लाखो रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
खोपोली शहरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिकेने काजुवाडी येथील रविंद्रनाथ टागोर जलशुध्दी केंद्रात लाखो लीटरच्या टाक्या उभारून खोपोली शहरातील शेवटच्या टोकापर्यत पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा विभागाने एक महिण्यापूर्वीच शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाळ्यामुळे आणि पावसाळा लांबल्यामुळे अनेक सोसायट्यांमधील बोरवेला पाणीच नसल्यामुळे खासगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. महिलांमधील नाराजीची सूर निघत आहे. यदा मान्सून उशिरा असल्याने पाणीटंचाईचे संकट खोपोली शहरावर अटळ असून, खोपोली नगरपालिका शहरात दोन वेळ पाणीपुरवठा कधी करणार की पाणीटंचाईचा सामना करावा लागणार, अशी संताप व्यक्त करीत आहे.







