शिपुरकर, वाघरे शाळेत देशभक्तीचा जागर; शहीदांच्या स्मरणाने अनेकांचे डोळे पाणावले
| माणगाव | प्रतिनिधी |
देशासाठी जगणे मोठे असते; पण देशासाठी हसत-हसत मरण पत्करणे त्याहूनही मोठे असते. या भावनेची प्रचिती देणारा, प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारा आणि कारगिलच्या अमर वीरांच्या बलिदानाची जाणीव करून देणारा कारगिल विजय दिवस माणगाव शहरातील शिपुरकर आणि वाघरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मंगळवारी (दि.28) भावपूर्ण, प्रेरणादायी आणि देशभक्तीने भरलेल्या वातावरणात साजरा करण्यात आला.
संपूर्ण विद्यालय परिसरात तिरंग्याचा अभिमान, शहीदांविषयीची कृतज्ञता आणि राष्ट्रभक्तीची भावना ओसंडून वाहत होती. प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यांत देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द दिसत होती, तर प्रत्येक घोषणेत मातृभूमीप्रती असलेले प्रेम आणि अभिमान स्पष्ट जाणवत होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी कारगिल युद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अमर जवानांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्या क्षणी संपूर्ण सभागृहात एक अनामिक शांतता पसरली होती. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. देशासाठी हसत-हसत मृत्यूला कवटाळणाऱ्या त्या वीरांची आठवण प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली. यानंतर माजी सैनिक प्रतिक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि आकर्षक परेड सादर केली. प्रत्येक पावलात सैनिकांची शिस्त, प्रत्येक सलामीत देशाप्रती असलेला सन्मान आणि प्रत्येक हालचालीत राष्ट्रसेवेची प्रेरणा दिसून येत होती.
भारत माता की जय…, वंदे मातरम्…, शहीद जवान अमर रहे…, जय जवान… जय हिंद… या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. त्या घोषणांचा आवाज केवळ विद्यालयापुरता मर्यादित नव्हता, तर तो प्रत्येक भारतीयाच्या अंतःकरणात पोहोचणारा होता. काही क्षणांसाठी वातावरण असे भारावून गेले की, उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे उभे राहिले.
यावेळी प्रतिक मोरे यांनी कारगिल युद्धातील भारतीय सैन्याचे अतुलनीय शौर्य, हिमाच्छादित डोंगरांवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लढलेले युद्ध, शत्रूला दिलेले चोख प्रत्युत्तर आणि विजयासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या बलिदानाच्या कथा विद्यार्थ्यांसमोर उलगडल्या. या प्रेरणादायी मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीचे स्फुल्लिंग प्रज्वलित झाले. अनेक विद्यार्थ्यांनी भविष्यात सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचा संकल्प व्यक्त केला. शिस्त, कर्तव्य, त्याग, राष्ट्रप्रेम आणि देशसेवा हीच खरी जीवनमूल्ये असल्याची जाणीव या कार्यक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात दृढ झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक तथा कमांडो ट्रेनिंग फोर्सचे प्रतिक मोरे उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापिका मनिषा मोरे, दिलीप उभारे, राजेंद्र सुर्वे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
तिरंग्याला मानवंदना
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी उभे राहून तिरंग्याला मानवंदना दिली आणि शहीद वीरांच्या स्मृतीला वंदन केले. त्यावेळी वातावरण इतके भावनिक झाले होते की, अनेकांच्या डोळ्यांत नकळत अश्रू दाटून आले. कारण प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती. कारगिलच्या त्या अमर वीरांनी आपल्या रक्ताने भारताचा तिरंगा उंच ठेवला… त्यांच्या त्यागामुळेच आज आपण सुरक्षित आहोत. त्यांचे बलिदान कधीही विसरले जाणार नाही.






