डिझायनर राख्यांना मागणी
| पाताळगंगा | वार्ताहर |
बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन हा सण दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे संपूर्ण बाजारपेठ रंगीबेरंगी राख्यांनी दुकाने सजली आहेत. मुलींसह महिलावर्ग बाजारपेठेत राख्या खरेदी करीत आहेत. बहुतेक चाकर-मालक बाजारपेठांमध्ये राखी खरेदी करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.
बाजारपेठत यंदा वेगवेगळ्या रंगांच्या व आकारांच्या राख्या बाजारात आल्या आहेत. कार्टुन कॅरॅक्टर्सच्या राख्या छोट्या दोस्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. महिला चांदीचे लेपन केलेल्या, मेटलच्या, कृत्रिम हिरे लावलेल्या, रुद्राक्ष, स्वस्तिक, ओम अशी धार्मिक चिन्हे असलेल्या राख्यांना पसंती देत आहेत. सर्वांनाच इतरांपेक्षा वेगळी राखी हवी आहे, अशी माहिती राखी विक्रेते यांनी दिली. दूरवरच्या भाऊरायाला राखी पाठविण्यासाठी पूर्वी ताई-माईंची पोस्टात मोठी गर्दी पाहायला मिळायची. आता ती जागा कुरिअर कंपन्यांनी घेतलेली आहे. परंतु, यंदा बाजारात राख्यांचे विविध प्रकार आले असल्यामुळे त्यांची मागणी तेवढीच वाढली आहे.
रक्षाबंधनसाठी विविध राख्यांनी सजली तळा बाजारपेठ
| तळा | वार्ताहर |
भाऊ बहिणीच पवित्र नाते जपणाऱ्या रक्षाबंधन सणासाठी विविध प्रकारच्या राख्यांनी तळा बाजारपेठ सजली आहे. तळा बाजारपेठेत विविधरंगी राख्या विक्रीसाठी दाखल झाल्या असून, एक दिवसावर रक्षाबंधन येऊन ठेपला असल्याने बहीण भावाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण जपण्यासाठी बहिणाबाईंनी आपल्या लाडक्या भावासाठी राखी घेण्यासाठी गर्दी केली आहे. अगदी 5 रुपयांपासून पुढे 400 रुपयांपर्यंत तसेच त्यापेक्षाही जास्त किंमतीच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. काही बहिणींना आपला भाऊ लांब राहत असल्याने राख्या पोस्टाने अथवा कुरिअरने पाठवाव्या लागतात. त्यामुळे तळा बाजारपेठेत दहा दिवस आधीच राख्या विक्रीसाठी दुकानात दाखल झाल्या होत्या.
पूर्वी गोंड्याच्या राखीला ग्राहकांची अधिक पसंती असायची. मात्र, आता त्यात बदल होऊन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लहान मुलांसाठी रंगीबेरंगी कार्टून, डोरेमन, क्रिश, छोटा भीम या कार्टून असलेल्या तर मोठ्यांसाठी गोंडा, रुद्राक्ष, हिरेजडित आशा अनेक आकर्षित राख्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे अशा विविधरंगी राख्या खरेदीसाठी बहिणींनी सुरुवात केली आहे.