विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन
। आगरदंडा । प्रतिनिधी ।
मासिक पाळीचा मुलींच्या आरोग्याशी थेट संबंध असतो. त्यामुळे स्वच्छतेची योग्य काळजी न घेतल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. धकाधकीचे आयुष्य, अभ्यासाचा ताण इत्यादी गोष्टींमुळे मुलींना व महिलांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी निर्णय फाऊंडेशनच्या संगीता बालोदे यांच्याकडून विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन दिघी अब्दुल सत्तार इस्माईल अंतुले शाळा, पी.एन.पी. हायस्कूल-वडवली, रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा-वडवली, दिघी कोळीवाडा महिला वर्ग त्याचप्रमाणे द. ग. तटकरे हायस्कूल-विरझोली येथील किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला एकूण 402 मुलींनी या कार्यक्रमांचा लाभ घेतला.
संगीता बालोदे किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करतेवेळी म्हणाल्या की, मासिक पाळीचा मुलींच्या आरोग्याशी थेट संबंध असतो. त्यामुळे स्वच्छतेची योग्य काळजी न घेतल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. धकाधकीचे आयुष्य, अभ्यासाचा ताण इत्यादी गोष्टींमुळे मुलींना व महिलांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने मुलींना आजारपण जास्त येते. तरी, मासिक पाळी व्यवस्थापन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, जुन्या रुढी आणि परंपरा यावर अवलंबून न राहता नवीन आधुनिक वातावरण आणि त्यावर प्रभावी उपाय, त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलींसाठी पौष्टिक आहार, पिण्याच्या पाण्याचे प्रमाण या सर्व गोष्टी मुलींच्या शारीरिक बदलासाठी असतात. तरी मुलींनी स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. नाही तर जंतू संसर्ग होणे, खाज सुटणे इत्यादी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, असे देखील संगीता बालोदे यांनी सांगितले आहे.
अदाणी फाऊंडेशनच्या जयश्री काळे यांनी पोषण कार्यक्रम अंतर्गत अदाणी फाऊंडेशन मार्फत असे कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अदाणी फाऊंडेशनचे अवधूत पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. ग्राम सखी नम्रता दिघीकर आणि अरुंधती पिळणकर यांनी जनजागृती साठी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे किशोरी वयातील मुलींमध्ये मासिक पाळी व्यवस्थापनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. अदाणी फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमांमुळे परिसरातील आरोग्यविषयक जनजागृती वाढत असून, भविष्यात असे अधिकाधिक उपक्रम राबवले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित मुख्याध्यापिका पूजा मुरकर, नितिशा मोकल, सुवर्णा डोळस, वडवली आगरी समाज महिला उपाध्यक्षा उज्वला बिराडी, मुख्याध्यापक मार्गे, ममता सोनवणे, शलाका पाटील, अश्रफी नदाफ, वंदना माने, संगीता बालोदे, अदाणी फाऊंडेशनचे जयश्री काळे, अवधूत पाटील, नम्रता दिघीकर, अरुंधती पिळणकर आणि किशोरवयीन मुली आदिंसह मान्यवर उपस्थित होते.