। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईकरांचा प्रवास महागण्याची चिन्हे आहेत. एसटी, रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीनंतर आता बेस्टच्या भाड्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. बेस्टच्या भाड्यात 5 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे तर बेस्टच्या एसी बसचं भाडं 6 रुपयांनी महागणार आहे. बेस्ट बसचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बेस्टच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला त्यानंतर आता बेस्टच्या भाड्यात वाढ करण्यात येणार आहे. निर्णय लवकरच बेस्ट भाडेवाढीचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
मुंबई लोकलनंतर बेस्टची बस सेवा ही मुंबईतील प्रमुख सेवा आहे. त्यामुळं हजारो लोक बेस्टने प्रवास करतात. सध्या बेस्ट बसचे भाडे 5 रुपये आहे. तर एसी बेस्ट बसचे भाडे 6 रुपये आहे. मात्र, लवकरच बेस्ट बसचे भाडे वाढू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
प्रवाशांना अतिरिक्त भुर्दंड
मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांची वाढ झाली आहे. तर, कुल कॅबच्या दरात 8 रुपयांची वाढ झाली आहे. 1 फेब्रुवारीपासून नवीन भाडे वाढ लागू झाली आहे. प्रस्तावित दरानुसार रिक्षाचे भाडे 11 टक्के आणि टॅक्सीचे भाडे 10 टक्के वाढले आहे. तसेच, कूल कॅबच्या भाड्यातही 20 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे.