। मुंबई । प्रतिनिधी ।
दिल्ली रेल्वे स्थानकात शनिवारी (दि.15) रात्री चेंगराचेंगरी होऊन 18 भाविकांचा मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. याआधी महाकुंभ मेळ्यातही चेंगराचेंगरी होऊन 30हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला होता. यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) खा. संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला फटकारले आहे. ते म्हणाले की, महाकुंभचा वापर भाजपने राजकीय प्रचारासाठी केला आहे. लोकांना आमंत्रित केले, मात्र अव्यवस्थेमुळे चेंगराचेंगरी झाली, असा घणाघात राऊत यांनी केला आहे. तसेच, सरकार खरा आकडा लपवत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.
रविवारी (दि.16) माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाकुंभच्या निमित्ताने सरकारने जी अव्यवस्था दाखवली त्याचे बळी दिल्ली रेल्वे स्थानकावर गेले. सरकारी आकडा 18 असला तरी किमान 120 ते 150 लोक चेंगराचेंगरीत मरण पावलेली आहेत. सरकार आकडे लपवत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, महाकुंभला जाण्यासाठी भाजपकडून निमंत्रण दिले जात आहे, जणून काही भाजपचाच सोहळा आहे. लोकांना भ्रमित केले जात आहे की, तुम्ही फक्त या, तुमच्या गाड्या-घोड्याची, जेवणाची, राहणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, तसे काहीही नसून इतकी अव्यवस्था कोणत्याच कुंभमध्ये झाली नव्हती, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले की, योगी आदित्यनाथ म्हणतात की, 50 कोटी लोक आले; मात्र, चेंगराचेंगरीत किती मेले ते सांगा. प्रयागराजला 7 हजारांहूीन अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. हे लोक कुठे गेले. ते एक करत चेंगराचेंगरीत मरण पावले किंवा अन्य कारणाने मरण पावले ते सांगा. शनिवारी दिल्लीतही चेंगराचेंगरी झाली आणि 100 हून अधिक लोक मरण पावले. परंतु, सरकार पहिल्यापासून आकडा दाबत आहे. रेल्वेमंत्री आकडा सांगायला तयार नव्हते. दिल्लीतील रेल्वे प्रशासनातील अधिकार्याच्या तोंडातून अचानक खरा आकडा बाहेर पडला आणि सत्य समोर आले, असेही राऊत म्हणाले आहेत.
महाकुंभचा राजकीय व्यापार
सरकारला थोडीही माणुसकी नाही. महाकुंभचा राजकीय व्यापार चालवला आहे. मार्केटिंग करून लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. दिल्लीच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी उसळल्याचे आपण गेल्या काही दिवसांपासून पाहत आहोत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमधून लोंढेच्या लोंढे निघालेले आहेत आणि सरकारचे त्याच्यावर नियंत्रण नाही. लोक रेल्वेच्या खिडकीच्या काचा फोडून आत घुसण्याचा प्रयत्न करताना आपण पाहिले असेल. लोक आत दरवाजे तोडून जात आहेत एवढी गर्दी अनावर झाली आहे. सरकार काय करतंय? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
महाकुंभ हे पवित्र पर्व आहे. श्रद्धेचा सागर आहे. तिथे लाखोंच्या, कोट्यवधींच्या संख्येने लोक येणार. परंतु, याचा वापर राजकीय प्रचारासाठी होत आहे. यामुळेच चेंगराचेंगरीसारख्या घटना होत आहे. सरकारने 50 कोटी लोकांना बोलावले, परंतु, त्यांची काय व्यवस्था केली?
– खा. संजय राऊत, शिवसेना (उद्धव ठाकरे)