कर्मचाऱ्यांची धावाधाव
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पहिल्या टप्प्यातील घरगणना आणि घरयादीची प्रक्रिया गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. 14 जूनपर्यंत ही गणना पुर्ण करण्याचे आदेश आहेत. मात्र तहसील कार्यालयाकडून सोमवारी(दि.8) कामांची माहिती देण्याची सुचना आल्यावर सर्व कर्मचाऱ्यांची धावाधाव झाली. अलिबागसह अन्य तहसील कार्यालयात जनगणनेच्या कामाचा अहवाल देण्यासाठी कर्मचाऱ्यांची गर्दी दिसून आली. जिल्हाधिकारी यांची जनगणनेच्या कामाबाबत बैठक होणार असल्याने सर्वांची तारांबळ उडाल्याचे बोलले जात आहे.
देशाच्या इतिहासातील 16 वी तर स्वातंत्र्यानंतरची आठवी जणगणना आहे. ही प्रक्रीया दोन टप्प्यात राबविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात घरगणना आणि घरयादी स्वरुपात गणना प्रक्रीया घेण्यात आली आहे. पाच हजार 98 प्रगणक, 863 पर्यवेक्षक, 69 क्षेत्रीय प्रशिक्षक तसेच 15 तहसीलदार आदी यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून कामाला लागली आहे. एक मेपासून ही प्रक्रीया सुरु केली आहे. घरोघरी जाऊन घरगणना केली जात आहे. काही कर्मचारी कडक उन्हात तर काही कर्मचारी सायंकाळी अथवा सकाळी लवकर गणनेचे काम करीत आहेत. 14 जूनपर्यंत ही प्रक्रीया असल्याने अनेक कर्मचारी त्यांच्या सोयीनुसार गणना करण्याचे काम करीत होते. हा कालावधी संपण्यासाठी एक आठवडा शिल्लक होता. मात्र गणनेबाबतची बैठक जिल्हाधिकारी जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे. तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांची बैठक घेतली जाणार आहे. त्यामुळे घरगणनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी तहसीलदारांनी कर्मचाऱ्या सोमवारी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले. 14 जूनपर्यंत मुदत असताना अहवाल, नकाशे जमा करण्याच्या सुचना तहसील कार्यालयातून आल्यावर कर्मचाऱ्यांची धावाधाव झाली. काही कर्मचाऱ्यांनी नाराजीही व्यक्त केली. तर काही कर्मचाऱ्यांचे काम पुर्ण झाल्यावर त्यांनी अहवाल व नकाशा जमा करण्याचे काम केले. सोमवारी(दि.8) तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांनी गर्दी केली. संपुर्ण तहसील कार्यालय या कामातच व्यस्त असल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी मंगळवारी बैठक घेणार असल्याने सर्वांची तारांबळ उडाली असल्याची चर्चा सुुरू होती.







