| मुरूड | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील मजगाव ग्रामपंचायत ही एक महत्वाची ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत हद्दीतील छोट्या मुलांना खेळण्यासाठी कोणत्याही प्रकारचे बालोद्यान नाही तसेच वृध्द मंडळींना बसण्याची हक्काची जागा नाही ती निर्माण करण्यासाठी शिव उद्यानाची निर्मिती करण्याकरीता ग्रामपंचायतीने मजगावच्या नाक्यावरील भूखंड उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करणारे एक निवेदन मजगावच्या शिवप्रेमी शिवभक्त मित्र मंडळातर्फे मजगाव ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे.
मंडळाचे अध्यक्ष नाथा भाऊ गिरणेकर, आशिष बुल्लु व अन्य सदस्यांनी हे निवेदन मजगावच्या सरपंचांसह ग्रामसेवक व कोळी समाजाच्या अध्यक्षांना दिले आहेसदर मंडळ मजगावसह यशवंतनगर पंचक्रोशीमध्ये सामाजिक व शिवकार्य, शिवविचार आणि आचार दूरवर पोहचावेत यासाठी गेली दहा वर्षे कार्यरत आहे.याच शिवकार्याचा एक भाग म्हणून मजगावमधील लहान मुले, महिला, वृध्द मंडळींना फिरण्या बसण्यासाठी एक हक्काची जागा मिळावी यासाठी मंडळातर्फे शिव उद्यान निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर उद्यान हे हिरवळीचे असेल तसेच तेथे शिवछत्रपतींच्या शौर्याच्या कथा, त्यांचे उच्च विचार त्यांचे कार्य आदींची माहिती देणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल जेणेकरून सद्यस्थितीत मोबाईलच्या मायाजालात गुरफटलेल्या बच्चे कंपनीला बाहेर काढण्यासाठी उपयोगी ठरेल. सदर नियोजित उद्यान उभारणीचा आराखडा, आरेखन ग्रामपंचायत जेव्हा मागणी करील तेव्हा दिला जाईल असे निवेदनात मंडळातर्फे म्हटले आहे.