अध्यक्षांचा सभागृहात नियंत्रणाचा अभाव
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्हा परिषदेची पहिलीच सभा गदारोळात पार पडली. सभे दरम्यान विविध मुद्द्यावरून सदस्यांमध्ये चर्चा झाली. बहुतांश सदस्य हे नव्याने निवडून आलेले असल्याने त्यांना कामकाजाच्या पध्दतीची पुरेशी माहिती नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले. नियमांची अपुरी माहिती, अनुभवाचा अभाव, यामुळे गोंधळ अधिक वाढल्याचे दिसून आले. अध्यक्षांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या सुरळीतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, नव्या सदस्यांना प्रशिक्षणाची गरज असल्याचे चर्चा सुरु झाली आहे.

केंद्र प्रमुखांकडे गट शिक्षणाधिकाऱ्याचा कारभार, मोर्बा धरणातील पाणी 23 गावांना मिळावे, प्राथमिक आरोग्य केंद्राची पडझड, शिक्षकांची रिक्त पदे, रेबीज, व इतर लसी व औषधे उपलब्ध करणे आदी पाणी, आरोग्य, शिक्षण अशा विविध प्रश्नांवर जिल्हा परिषदेची सभा गाजली. लिहून आणलेले आपले प्रश्न वाचून दाखविण्यासाठी अनेकजण पुढे – पुढे करीत होते. यावेळी एकमेकांमध्ये स्पर्धा झाली. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेत सदस्यांचा गदारोळ संपुर्ण सभागृहाने पाहिला. यावेळी अध्यक्षाचा सभागृहात नियंत्रणाचा अभाव दिसून आला. जिल्हा परिषदेची सभा की, गाव सभा अशी ही चर्चा सभागृहात अनेकजण दबक्या आवाजात करीत होते. ही सभा उपाध्यक्ष आणि कृषी सभापतीच चालवित असल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उधाण आले. प्रदिर्घ कालावधीनंतर रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मंगळवारी (दि.7) दुपारी झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.
या सभेमध्ये सुरुवातीला वित्त, आरोग्य, शिक्षण, कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती पदाची निवड करण्यात आली. मंगेश वाकडीकर यांनी या पदांची निवड जाहीर केली. या निवडीनंतर राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्य गिता जाधव यांनी आपल्या शैलीने या सभापती निवडीबाबत अभिनंदन करीत असताना अर्थ व बांधकाम सभापती पद मिळण्याची आशा काहींना होती. अनेकांनी बॅनरही लावले होते. परंतु, ते पद मिळाले नाही, असा चिमटा काढत योग्य तो पदाला न्याय द्यावा असे त्यांनी सांगितले.
आयत्यावेळच्या विषयामध्ये शिक्षण या विषयावर सभा गाजली. जिल्हा परिषद शाळांमधील कमी पटसंख्या, विस्तार आणि केंद्र प्रमुखांकडे गट शिक्षणाधिकारी पदाची धुरा, रिक्त असलेली शिक्षकांची पदे, बंद पडलेल्या शाळा अंगणवाडीसाठी देणे. तसेच, जलजीवन मिशन योजनेची अपुर्ण कामांमुळे गावागावात निर्माण झालेली पाणी टंचाई, ठेकेदार व अधिकारी यांनी संगमनताने केलेला भ्रष्टाचार अशा अनेक विषयांवर सदस्यांनी आपले प्रश्न मांडले. मात्र, प्रश्न मांडत असताना मोजकेच सदस्य वगळता अन्य सदस्यांमध्ये प्रश्न मांडण्यासाठी प्रचंड गदारोळ सुरु झाली होती. जिल्हा परिषदेची सभा आहे, की गाव सभा अशी चर्चा या सभागृहात उपस्थितांमध्ये दबक्या आवाजात सुरु झाली. जणू काही एकमेकांची बोलण्यासाठी स्पर्धाच सुरु असल्याचे दिसून आले. आपल्या मतदार संघातील बाजू मांडताना कोणत्याही सदस्यांना ताळमेळ दिसून आला नाही. एकमेकांशी बोलण्यावरून वाद घातल असल्याचे संपुर्ण सभागृहाने पाहिले. जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्यांमध्ये पाण्याचा दुष्काळ सुरु झाला आहे. एका बाजूला महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रम घेत असताना दुसऱ्या बाजूला घर आणि पाणी यातच महिलांचे जग सध्या सुरु आहे, अशी चिंता काही सदस्यांनी व्यक्त केली. बंद असलेल्या प्राथमिक शाळांमध्ये अंगणवाडी सुरु करण्यात यावी, शिक्षक नसल्याने शाळा बंद झाली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणे. जिल्हापरिषद शाळांची दुरुस्ती, टँकरमुक्त रायगडसाठी प्रयत्न करणे. शिक्षक समाजयोजन, अपुरे शिक्षक, घसरती पटसंख्या, जलजीवन योजनेची अपुरी कामे, जिल्ह्यात पाण्यासाठी होणारी गावे, वाड्यांमधील नागरिकांची होणारी वणवण, आधुनिक शिक्षणाची कमतरता, जिल्हा परिषद व्यवस्थेचे अपयश, अशा अनेक मुद्द्यांवर सभा गाजली. यावेळी शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करून सदस्यांनी त्यांना धारेवर धरले.
वैकुंठ पाटीलचा खेळ निष्फळ
जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत वैकुंठ पाटील यांची राजकीय खेळी निष्फळ ठरली आहे. अध्यक्षपद मिळण्याची आशा आधीच मावळल्यानंतर त्यांनी अर्थ व बांधकाम सभापतीपद मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मान्यवर नेत्यांची मदत घेत त्यांनी पडद्यामागे हालचाली केल्या, मात्र शेवटच्या क्षणी समीकरणे बदलली आणि हे पद त्यांच्या हातातून निसटले. या घडामोडींमुळे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. अखेरीस त्यांना कृषी व पशुसंवर्धन सभापतीपद स्विकारावे लागले. अपेक्षेपेक्षा कमी महत्वाच्या या पदावर समाधान मानावे लागल्याने त्यांच्या समर्थकांमध्येही नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान जिल्हा परिषदेत सत्तेच्या वाटपात शेवटपर्यंत रंगलेल्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. पाटील यांची पुढील राजकीय वाटचाल कशी राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अर्थ सभापती पद चंद्रकात कळंबे यांच्याकडे देण्यात आले असून वैकुंठ पाटील यांना कृषी व पशुसंवर्धन सभापती पदावर समाधान मानावे लागले.
विविध पदांच्या सभापतींची निवड
रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्याकडे आरोग्य व बांधकाम विभागाची धुरा सभापती म्हणून सोपविण्यात आली असून वित्त व शिक्षण सभापती म्हणून चंद्रकांत कळंबे आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून वैकुंठ पाटील यांची निवड करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वैकुंठ पाटील यांची सारवा सारव
अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावा शेवा अटल सेतू प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रासाटी नियुक्त नव नगर, विकास प्राधिकरण, क्षेत्रात तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पासाठी भूसंपादन व भू वाटप करण्याच्या अनुषंगाने भुसंपादन व भुवाटप धोरण लागू करण्यास मान्यता देण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयावर चर्चा करीत असताना उरणमधील काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनिष पाटील, यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवून शासन निर्णयाला स्थगितीचा ठराव घेण्यात यावा, अशी मागणी सभागृहात केली. यावर भाजपचे वैकुंठ पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सारवा सारव करून हा प्रश्न दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढील बैठकीत हा विषय चर्चेत घेण्यात यावा असे सदस्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याची बाब सभागृहात पाटील यांनी दाखवून दिली.






