| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला नवीन उंची मिळवून देणारे माजी पंतप्रधान तसेच ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी (दि. 26) नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. निधनसमयी ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे देशाने एक अर्थऋषी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी (दि.28) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे देशभरात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून, सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री 9 वाजून 51 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. मनमोहन सिंग यांच्यामागे पत्नी गुरशरण कौर व तीन कन्या असा परिवार आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी दोनदा देशाचे पंतप्रधानपद भूषविले. गेल्या काही वर्षांपासून ते प्रकृतीच्या तक्रारींमुळे त्रस्त होते. त्यांना याआधी काही वेळा प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांचे निधन झाल्याचे वृत्त कळल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, सरचिटणीस व खासदार प्रियांका गांधी, भाजपचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी एम्समध्ये दाखल होत त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.