बेरोजगारीमुळे तरूणांसह कुटुंबाचा निर्णय
कोरोनाने लोकांना केले उद्ध्वस्त
। कापोली । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील अनेक कुटुंब आणि बेरोजगार तरुण मुंबईला नोकरीच्या शोधात जात आहेत. रोजगार नसल्याने आपले मुळ गाव सोडून आईवडीलांसह मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेली दोन वर्षे कोरोना रोगाने थैमान घातले असताना हाताला काम नसल्याने अनेक लोकं घरातच बसून होते. खिशात पैसे नसल्याने अनेक लोकांचे अक्षरशः हाल होत होते. जे काही पैसे जमा होते, ते लॉकडाउनच्या काळात खर्च करून संपून गेले. आता जरी लॉकडाउन शासनाने उठवला असला तरी लोकांना काम धंदा नसल्याने उपासमार होऊ लागली आहे.
बहुतेक कुटुंब आणि बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात गावाकडून मुंबईला केवळ नाईलाजाने वळले आहेत. जवळ जवळ पन्नास टक्के लोक शहरात गेलेले चित्र पहायला मिळत आहे. सर्रास घरकामाला महिला व चाळीशी पार मंडळी सुरक्षा रक्षक कंपनीत काम करण्यास प्राधान्य देत आहेत. गावातील लोकं म्हणतात आमच्या गावात एवढी परीस्थिती कधीच उद्भवली नव्हती. कारण कामधंदा उरला नाही त्यामुळे महागाईच्या ओझ्याखाली तुटपुंज्या पैश्यात कुटुंब चालवणे अवघड होऊन बसले आहे.मुलं मुंबईला भाड्याने खोली घेऊन रहात असल्यामुळे आईवडीलांना अधिक खर्च नको ह्या उद्देशाने म्हातार वयात त्यांना देखिल सोबत घेऊन गेले आहेत.
आज अनेक गावात पहायला गेलो तर घराचे दरवाजे बंद अवस्थेत आहेत. कधी नव्हे असे विदारक चित्र पहायला मिळत आहे. काही गावात तर वृद्ध लोकच नजरेस पडत आहेत. मोजकेच लोकं उरली आहेत. काही गावात जर एखादी म्हातारी व्यक्ती आजारी पडली तर तरुण मुलं देखिल दवाखान्यात उचलून न्यायला नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
शासनाने उद्योगधंदे उभारावेत
शासनानेही ठोस पावले उचलून मोठ मोठे उद्योगधंदे तालुक्यात प्रयत्न करून आणावेत अशी मागणी तरुण मुलांकडून होऊ लागली आहे. अन्यथा उरली सुरली कुटूंब देखिल गाव सोडून शहराकडे वळतील अशी परिस्थिती निर्माण होईल. उद्योग मंत्र्यांनी ह्याची जाणीव ठेवून कोकणातील तरुणांना उभारी देण्यासाठी दौरे करावेत. अन्यथा खेडी ओस झालेली दिसतील.







