। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल सेवांचा उपयोग वाढविण्यासाठी केंद्र सरकारने अॅग्रीस्टॅक ही योजना सुरू केली आहे. 14 ऑक्टोबर 2024 पासून महाराष्ट्रसह देशातील 24 राज्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शेतकर्यांची माहिती एकाच ठिकाणी संकलित करून त्यांना विशिष्ट ओळख क्रमांक प्रदान करणे आणि त्याद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा त्वरित लाभ मिळवून देणे हा आहे. त्यामुळे शेतकर्यांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ अधिक सोपे आणि जलद पद्धतीने मिळेल.
या योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांच्या जमिनीची माहिती, तसेच हवामान आणि शेतीशी संबंधित इतर महत्त्वाचे डेटा गोळा करून त्यांचे सतत अद्ययावतीकरण केले जाईल. याशिवाय शेतकर्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ, कर्ज आणि कृषी विमा सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्याचा योजनेचा उद्देश आहे. दरम्यान, कृषी क्षेत्रातील डेटा अधिक चांगल्या प्रकारे वापरला जावा आणि शेती अधिक फायदेशीर व्हावी यासाठी शेतकर्यांनी या योजनेत लवकरात लवकर नोंदणी करून आपल्या शेतीच्या विकासाला गती द्यावी, असे आवाहन मुरुड तालुका कृषी अधिकारी मनिषा भुजबळ यांनी केले आहे.