तीन महिन्यांपासून गंभीर समस्या
तालुका स्तरावर संशोधन करण्याची मागणी
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
गेल्या तीन महिन्यापासून मुरूड तालुक्यातील अरबी समुद्रकिनारपट्टीत मासळी मिळत नसल्याने पारंपरिक मच्छिमार कमालीचे हवालदिल झाले असून, येथील अनेक नौका किनार्यावर नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, समुद्रकिनारी असलेल्या मुरूड मासळी मार्केटमध्ये रोज बाहेरगावची मासळी विक्रीस येत असल्याची माहिती मिळत असून, सुकी मासळीदेखील बाहेरगावहून येत आहे.
मुरूड तालुक्यातील एकदरा येथील हनुमान मच्छिमार सहकारी सोसायटीचे चेअरमन पांडुरंग आगरकर आणि व्हॉइस चेअरमन पांडुरंग थोकजी, रोहन निशानदार यांनी शुक्रवारी बोलताना सांगितले की, पर्ससीन मासेमारी आणि एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारीचे कंबरडे मोडले आहे. समुद्रात गेल्यावर जेमतेम 5 ते 7 किलोपर्यंत फक्त कोलंबी मिळते. यातून डिझेलचा खर्चदेखील सुटत नाही. मुरूडच्या मार्केटमध्ये येणारी मासळी ही बाहेरगाव येथून येत असून, येथील समुद्रात मासळी मिळत नसल्याने बहुतांश नौका किनार्यावर नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. तीन महिन्यांपासून अशीच परिस्थिती आहे. नांदगाव, एकदरा, राजपुरी, बोर्ली, मजगाव, खामदे खाडीतदेखील मासळी मिळणे दुर्लभ झाले आहे.
सध्या कोलंबीचा, मोठ्या मासळीचा मोसम आहे. तरी देखील कोलंबी किंवा मोठी मासळी मिळत नाही. सुरमई, पापलेट, रावस ही येथे दिसणारी मासळी बाहेरून मुरूड मार्केटमध्ये येत असून, या मासळीचे दर परवडण्यापलीकडे आहेत. मुरूडजवळील समुद्रात केवळ काहीशी कोलंबी मिळते. ही कोलंबी रु 40 ते रु 50 किलोने विकली जाते. म्हणजे, मच्छिमारांच्या नौकेचा डिझेल खर्चदेखील सुटत नाही.
मुंबईतून येथे जवळा, बोंबील, सुरमई आदी प्रकारातील सुकी मासळी येथे येत आहे. येथे सध्या भरपूर थंडी पडली आहे. पदमजलदुर्गा जवळ अदानी पोर्टसाठी गेल्या दोन महिन्यांपूर्वी समुद्रातील चिखल काढण्यासाठी ड्रेजिंग करण्यात आले होते. त्यानंतर सिझन असूनही कोलंबी मिळेनाशी झाल्याची माहिती मच्छिमारांनी दिली. मासळी मिळत नसल्याने बोटीचा खर्च, खलाशी खर्च अंगावर पडत आहे. मासळीचा ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा, अशी मागणी देखील या हताश झालेल्या मच्छिमारांनी केली आहे. ऐन सिझनमध्ये समुद्रात मोठी मासळी मिळत नसल्याने याबाबत समुद्रकिनारी तालूका स्तरावर संशोधन करावे, अशी मागणी मच्छिमारांतून केली जात आहे. मुरूड समुद्रातील मासळी उत्तन, पालघर परिसरातील समुद्रात जात असल्याची माहिती एकदरा येथील हनुमान मच्छिमार सोसायटी कार्यालयात शुक्रवारी काही मच्छिमारांनी दिली. मासळी मिळत नसल्याने ओला दुष्काळ पडल्याचे दिसून येत आहे.