स्वप्नील कुसाळेने पटकावले कांस्यपदक
। पॅरिस । वृत्तसंस्था ।
क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या महाकुंभात म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. स्टार नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगनंतर पॅरिस ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्राच्या मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे याने 50 मीटर रायफल 3 पोझिशन नेमबाजीत भारतला आणखी एक मेडल जिंकून दिले आहे.
1995 मध्ये महाराष्ट्राच्या कोल्हापुर मध्ये जन्मलेला स्वप्नील कुसळेने पॅरिस ऑलिम्पिकच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये 451.4 गुण नोंदवून इतिहास रचत त्याने भारतासाठी कांस्यपदक जिंकले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे एकूण तिसरे पदक आहे. या सामन्यात चीनच्या लियू युकुनने 463.6 गुणांसह पहिले स्थान पटकावले. त्याचवेळी युक्रेनच्या सिरही कुलिशने 461.3 गुणांसह रौप्यपदक जिंकले.
याआधी नेमबाजीत ऑलिम्पिक 2004 मध्ये राज्यवर्धन राठोडने भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. अथेन्स ऑलिम्पिकमध्ये त्याने हे पदक जिंकले हाते. यानंतर अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकावर निशाणा साधला होतो. तसेच, 2012 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये दोन भारतीय नेमबाजांनी पदके मिळवली होती. यात विजय कुमारने रौप्य तर गगन नारंगने कांस्यपदक पटकावले होते.
72 वर्षानंतर महाराष्ट्रात ऑलिम्पिक पदक
राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेला नेमबाज स्वप्नीलकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा होतीच आणि त्यांने तो विश्वास सार्थ ठरवला. स्वप्नीलने 451.4 गुणांसह कांस्यपदक पटकावले. 1952 मध्या खाशाबा यांनी भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते आणि त्यानंर 72 वर्षानंतर महाराष्ट्रात आज स्वप्नीलने ऑलिम्पिक पदक आणले.
नातवानं करून दावलं
स्वप्नीलचे वडील सुरेश कुसळे म्हणाले, मला खात्री होती, स्वप्नील पदक जिंकेल. गेल्या 12-13 वर्षांची तपश्चर्या कामी आली. त्याने भारताचा तिरंगा फडकवला याचा मला अभिमान आहे. आई अनिता कुसळे यांनीही खूप आनंद व्यक्त केला. स्वप्नीलच्या सामन्यापूर्वी आई-वडिलांनी ग्रामदेवतेला अभिषेक केला होता. यावेळी स्वप्नीलच्या आज्जीच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. आज्जी म्हणाली की, लय चांगलं झालं… म्हाया नातवानं करुन दावलं, माझा नातू लय मोठ्ठा झाला… आमचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी हाय… लहानाचा मोठ्ठा झालाय, लहानपणापासून बाहेर गेलाय, लय चांगलं झालं.. मुके घेऊन त्याचं कौतुक करणार…
नववीत नऊ अचूक शॉट्स
स्वप्नीलच्या वडिलांनी सांगितले की, तो पहिली ते चौथी गावात शिकला आणि पाचवी ते सातवी तो कोल्हापूरच्या शाळेत शिकला. आठव्या इयत्तेत त्याची निवड झाल्यानंतर तो सांगलीत स्पोर्ट्स सेंट्रलपासून जवळ असलेल्या शाळेत गेला. नववीत असताना त्याला सायकलिंग की रायफल यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले आणि त्याने रायफल उचलली. पहिल्यांदा त्याला रायफल दिली तेव्हा त्याने 10 पैकी नऊ शॉट्स अचूक मारले. तेव्हा त्याला बंदुक माहित नव्हती, त्यातली इतर माहिती तर सोडाच.







