पांढर्या कांद्याचे क्षेत्र नेणार एक हजार हेक्टरवर
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागचा पांढरा कांदा स्थानिकांसह पर्यटकांच्या पसंतीला कायमच उतरला आहे. अलिबागच्या कांद्याला जीआय मानांकन प्राप्त झाल्याने एक वेगळी ओळख अलिबागच्या पांढर्या कांद्याची निर्माण झाली आहे. तीनशे हेक्टर क्षेत्रात लागवड होणार्या कांद्याच्या क्षेत्रात आता वाढ होण्याची शक्यता आहे. एक हजार हेक्टर क्षेत्र करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांना यातून उभारी मिळण्याची शक्यता आहे.
अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे, वाडगाव, नेहुली आदी परिसरातील असंख्य शेतकरी पांढर्या कांद्याची लागवड करतात. अलिबागच्या पांढर्या कांद्याला रायगड जिल्ह्यासह वेगवेगळ्या राज्यांतून मागणी आहे. लाखोंची उलाढाल जानेवारी ते मे या कालावधीत होते. अलिबाग तालुक्यात पांढर्या कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यानंतर रोहा तालुक्यातील एक ते दोन गावांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. पांढर्या कांद्याचे क्षेत्र सध्या 300 हेक्टर इतके आहे. या क्षेत्रात वाढ करण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पुढाकार घेतला आहे. कांदा उत्पादक शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पावले उचण्यात आली आहेत.
हवामान आणि विविध समस्यांमुळे शेती उत्पादकता आणि नफा वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून शेतकर्यांना शिक्षित करणे, ही काळाची गरज आहे. शेतकर्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व बँकांचे सहकार्य यांच्या मदतीने शेतीत आवश्यक ते बदल करून उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यातील पांढर्या कांद्याचे क्षेत्र एक हजार हेक्टर करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हधिकारी किशन जावळे यांनी एका कार्यक्रमात सांगितले. त्यामुळे पांढर्या कांद्याच्या क्षेत्राचा विस्तार वाढण्याची शक्यता आहे.