परळ- अलिबाग बस चालकाला कार्लेखिंडीत मारहाण; पोलिसांत गुन्हा दाखल
। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांनी राज्यात काही ठिकाणी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अशातच परळवरुन प्रवाशांना आणणार्या बस चालक काशिनाथ गायकवाड यांना कार्लेखिंडीत अज्ञाताकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. प्रवासी उतरत असताना अचानक दोघांनी बसमध्ये येऊन त्यांना मारहाण केली.
त्यानंतर अलिबागला येताच अलिबाग आगारातील कर्मचार्यांनी बांगड्या घालून त्यांचा निषेध केला. कर्मचार्यांचा विरोध न जुमानता त्या बस चालक व वाहकाने बस आणल्यामुळे कर्मचार्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. परळ-अलिबाग बसवरील चालकास कार्लेखिंडीत मारहाण करणार्या अज्ञाताविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढिल तपास पोलीस करीत आहेत.