डब्लुपीएलची धडाकेबाज सुरूवात; रिचा घोषची जबरदस्त खेळी
। वडोदरा । वृत्तसंस्था ।
महिला प्रीमियर लीग 2025 ला शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. पहिलाच सामना गतवर्षीचा चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध गुजरात जायंट्स यांच्यात पार पडला. त्याचबरोबर पहिलाच सामना ऐतिहासिक ठरला आहे. यंदाच्या स्पर्धेची सुरूवातच विक्रमाने झाली आहे. आरसीबीने पहिल्याच सामन्यात विक्रमी धावांचा पाठलाग करत गुजरात संघावर 6 गडी राखून विजय मिळवला आहे.
आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य असल्याचे आरसीबीने पहिल्या 10 षटकांत सिद्ध केले. मात्र, गुजरातच्या बेथ मुनी आणि अॅश्ले गार्डनर यांनी संघाला 200 अधिक धावांचा टप्पा गाठण्यात मदत केली. बेथ मुनीने 42 चेंडूत 8 चौकारांसह 56 धावा केल्या. तर, कर्णधार अॅश्ले गार्डनरने 37 चेंडूत 8 षटकार आणि 3 चौकारांसह 79 धावांची वादळी खेळी केली. यासह गुजरातने पहिल्याच सामन्यात 5 गडी गमावत 201 धावांची खेळी केली. आरसीबीकडून रेणुका सिंगने 2 बळी घेतले. तर, कनिका अहुजा, जॉर्जिया वेयरहम आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
त्यानंतर 202 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणार्या आरसीबीच्या दोन्ही सलामीवीरांना गुजरातच्या अॅश्ले गार्डनरने सुरूवातीच्या षटकांमध्येच बाद करत मोठे धक्के दिले. मात्र, आरसीबी डगमगला नाही. उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीने 34 चेंडूत 57 धावांची शानदार खेळी केली. तर, राघवी बिश्तने 25 धावा करत चांगली साथ दिली. सायली सातघरेने पेरीला तर डिएंड्रा डोटिनने राघवीला बाद करत चांगली भागदारी तोडली. मात्र, यानंतर आलेल्या रिचा घोष आणि कनिका अहुजा यांनी गियर बदलत उत्कृष्ट कामगिरी करत 93 धावांची धमाकेदारी खेळी करत अशक्य विजय मिळवून दिला. पहिल्याच सामन्याची सामनावीर ठरलेली रिचा घोष हिने 27 चेंडूत 64 धावांची जबरदस्त खेळी केली आणि विजयी षटकारासह संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
दरम्यान, गुजरात संघाला त्यांच्या खराब क्षेत्ररक्षणाचा मोठा फटका बसला. संघाने एलिसा पेरीला 3 वेळा झेलबाद करण्याची संधी गमावली. तर, रिचा घोष पहिल्याच चेंडूवर सीमारेषेवर मोठा फटका खेळताना झेलबाज होणार होती, परंतु, गुजरातच्या खेळाडूने तो झेलही सोडला आणि रिचाने वादळी खेळी करत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.
रिचा घोष 27 चेंडू, 4 षटकार, 7 चौकार, 64 धावा
विक्रमी धावांचा पाठलाग
महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात आरसीबीचा संघ सर्वात मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य गाठणारा पहिला संघ ठरला आहे. आरसीबीने 10 चेंडू शिल्लक ठेवत 202 धावांचे विजयी लक्ष्य गाठले आहे. यापूर्वी हा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर होता, ज्यांनी 2024 मध्ये गुजरात जायंट्सविरुद्ध 191 धावांचे लक्ष्य गाठले होते. गुजरातसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे की इतिहासातील चार सर्वात मोठे पाठलाग फक्त गुजरात संघाविरुद्धच झाले आहेत.