पावसासह रानडुक्कर, माकडांचा हैदोस
। सुतारवाडी । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील सुतारवाडी परिसरातील म्हसकरवाडी, हेटवणे, वाळंजवाडी, ढोकळेवाडी, सुतारवाडी, आंबिवली यांच्यासहित आजूबाजूच्या असंख्य गावातील भातशेती पावसासहित रानडुक्कर व माकडांनी जमीनदोस्त केली आहे. यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या दुहेरी संकटांचा सामना करताना येथील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तसेच, नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरत जुन महिन्याच्या सुरुवाती पासून पाऊस उत्तम प्रकारे झाला. यामुळे भात लागवड वेळेवर करण्यात आली. भातपीक उत्तम आल्यामुळे शेतकरी समाधानी दिसत होता. परंतु, हे समाधान फार काळ टिकू शकले नाही. कारण हातातोंडांशी आलेले पीक परतीच्या पावसाने हिरावून नेला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दरवर्षी दसरा झाल्यानंतर भात कापणीला सुरुवात होत असून ती दिवाळी पूर्वी बांधणी करून पूर्ण होत असे. परंतु, यावर्षी दिवाळी जवळ आली तरी परतीचा पाऊस जोरदार सुरु असल्यामुळे भातशेती कापणीला विलंब होत आहे.
यातच गेले काही दिवस वादळी वार्यासह सतत पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्यामुळे उभे पीक आडवे झाले असून पीक कुजत चालले आहे. यातच सुतारवाडील असंख्य गावे जंगल परिसरातील असुन येथे रानडुक्कर व माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही जनावरे शेतात हैदोस घालत असून उरल्या सुरलेल्या पीकांचे नुकसान करत आहेत. याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसत असुन शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. यामुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे तात्काळ पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातुन केली जात आहे.