| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रतिष्ठेची समजली जाणारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक येत्या 16 सप्टेंबरला अलिबागमध्ये होणार आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर प्रशासन कामाला लागले असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून देण्यात आली आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता गेल्या अनेक वर्षापासून आहे. ही सत्ता कायम टीकवून ठेवण्यासाठी पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शेकाप, महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत.
निवडणुकीसाठी शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, नृपाल पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा बँकेचे माजी व्हाईस चेअरमन सुरेश खैरे यांच्यासह अनेक उमेदवारांनी 16 जून रोजी अर्ज भरले होते. 15 जूलै रोजी मतदान होणार होते. मात्र काही कारणास्तव मतदान प्रक्रीया पुढे ढकलण्यात आली. मतदानाची तारीख कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागून राहिले होते. अखेर ही उत्कंष्ठा संपली असून येत्या 16 सप्टेंबरला सकाळी आठ ते सायंकाळी चार यावेळेत मतदान अलिबागमध्ये होणार आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 जागांसाठी ही निवडणूक असून 18 जागा बिनविरोध आहेत. आता फक्त तीन जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यावेळी एक हजार 369 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक शांततेत व पारदर्शक पार पाडण्यासाठी प्रशासन कामाले लागले असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप यांनी दिली.