पर्यावरणपूरक रंगांना प्राधान्य देत धुलिवंदन उत्साहात
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि.2) सायंकाळी विधीवत पूजा करून होळी दहन करण्यात आले, तर मंगळवारी (दि.3) सकाळपासून रंगांची उधळण करीत धुलिवंदनाचा सण जल्लोषात साजरा करण्यात आला. लहान मुलांपासून तरुणाईपर्यंत सर्वांनी एकत्र येत सणाचा आनंद लुटला. यंदाही पर्यावरणपूरक रंगांना प्राधान्य देत रायगडकरांनी सण साजरा करण्यावर भर दिल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. चाकरमानीही मोठ्या उत्साहाने या उत्सवात सहभागी झाले होते.
होळीच्या आदल्या दिवशी सायंकाळी सावर, सुपारी, केळी आदी झाडांच्या मोठ्या फांद्यांचे पूजन करण्यात आले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जल्लोषात या फांद्या मोकळ्या जागी नेऊन तेथे होळी उभारण्यात आली. होळीच्या दिवशी सायंकाळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मनोभावे पूजा करण्यात आली. त्यानंतर रात्री दहा वाजल्यानंतर होळीचे दहन करण्यात आले आणि पारंपरिक पद्धतीने बोंब देत सण साजरा करण्यात आला.
मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये नोकरी-व्यवसायासाठी स्थायिक झालेले चाकरमानी होळी आणि धुळीवंदन निमित्त गावी परतल्याने गावोगावी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कोकणातील शिमगोत्सवाला गणेशोत्सवाइतकेच महत्त्व असून रायगड जिल्ह्यात हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. रोहा, महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, श्रीवर्धन आदी तालुक्यांत होळीचा उत्साह विशेषत्वाने जाणवत होता. यानिमित्ताने पालखी नाचविण्याची पारंपरिक कला जपली जात असल्याचे दिसून आले. आट्यापाट्या यांसारख्या पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले. लोककला, पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. गावोगावी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या.
मंगळवारी (दि.3) धुलिवंदनानिमित्त सकाळपासूनच रंगांची उधळण सुरू झाली. शहरी भागासह ग्रामीण भागातही सणाचा आनंद ओसंडून वाहताना दिसला. अलिबागमधील समुद्रकिनाऱ्यांवर तसेच वरसोली, काशीद आदी ठिकाणी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी एकमेकांच्या अंगावर रंग उडवत जल्लोष केला. पारंपरिक वाद्यांच्या साथीने मिरवणुका काढण्यात आल्या.
“होळी रे होळी… पुरणाची पोळी…” अशा घोषणा देत वातावरण रंगतदार झाले होते. विशेष म्हणजे, मोबाईलमध्ये रमणारी बच्चे कंपनी आणि तरुणाई यावेळी उत्स्फूर्तपणे सणात सहभागी झाल्याचे चित्र दिसून आले. ढोल, खालूबाजा वाजविण्यात तरुण मंडळी दंग होती. एकमेकांवर रंग व पाण्याची उधळण करत आनंद व्यक्त करण्यात आला. रासायनिक रंगांऐवजी पर्यावरणपूरक रंगांचा वापर करण्याकडे तरुणाईचा कल असल्याचे दिसून आले.
दरम्यान, सणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रायगड पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. रंगांची उधळण करण्यासाठी दुचाकींवरून धोकादायक पद्धतीने फिरणाऱ्या अतिउत्साही तरुणांवर कारवाई करण्यात आली. गर्दीचा फायदा घेत महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर पोलिसांनी बारीक नजर ठेवली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात होळी आणि धुलिवंदनाचा सण उत्साहपूर्ण, शांततामय आणि आनंददायी वातावरणात पार पडला.








