पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर रेल्वे सोडली
| माणगाव | वार्ताहर |
माणगाव रेल्वे स्थानकावर दि. 6 सप्टेंबर रोजी परतीच्या चाकरमान्यांनी जबलपूर एक्स्प्रेस रेल्वे रुळावर उतरून रेल्वे रोको केला. संध्याकाळ 4.30 वा च्या सुमारास आलेली वापी गाडी माणगाव रेल्वे स्थानक येथे थांबली. परंतु, रेल्वेमधील प्रवाशांनी दरवाजे उघडले नाही. त्यामुळे सुरत वापी रिझर्वेशन तिकीट असलेल्या प्रवाशांना या रेल्वेमध्ये चढता आले नाही. त्यामुळे त्यांनी 4.45 वा च्या सुमारास आलेली जबलपूर एक्स्प्रेससमोर उभे राहून रेल रोको केला.
याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, स.पो.नि. लहांगे, पो.स.ई. गायकवाड, पो.उ.नि. अनंत पवार, पो.शि. शाम शिंदे, रामनाथ डोईफोडे, सचिन सोनकांबळे आपल्या टीमसह रेल्वे स्थानक येथे तातडीने हजर झाले. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने स्टेशन मास्तरसोबत बोलून प्रवाशांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. येणारी 6.25 वाजताची गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेस गाडी क्र. 12449 यामध्ये प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली. या गाडीला माणगाव येथे थांबा नसूनसुद्धा प्रवाशांच्या व पोलीस प्रशासनाच्या मागणीमुळे ही रेल्वे माणगाव येथे थांबवून त्या प्रवाशांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे स्टेशन मास्टर यांनी सांगितले.