। मुंबई । प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. मात्र, ज्या महिला शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना दरमहा फक्त 500 रुपये दिले जातील. यावरून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यात ज्यावेळी लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, महायुती सरकारने लाडकी बहिण योजना आणली तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? संजय गांधी निराधार योजनेतील महिलाना लाडक्या बहिणी योजनेचे फक्त 500 रुपये देणार हे दुर्दैव आहे, ही महिलांची फसवणूक आहे. ज्याला कुटुंबात आधार नाही, अशा महिलांना केंद्रसरकार 1500 देत होते, त्यांना फायदा झाला असता. परंतु, दीड हजारात घर चालते का? असेही ते म्हणाले. आता लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी आता फक्त 500 रुपयेच देणार्या सरकारची कीव येत आहे. तसेच, निवडणूक असताना मतांसाठी महिलाना सरसकट पैसे दिले, आता मात्र तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा क्लृप्त्या लढविणे हे महायुती सरकारचे पाप आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे.