| पनवेल | वार्ताहर |
आपल्या विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांनी मंगळवारी (दि.12) पालिकेच्या विरोधात पालिका मुख्यालया बाहेर आंदोलन केले. यावेळी पालिकेचे मेडिकल ऑफिसर यांनी आशा स्वयंसेविकांच्या काही मागण्या मान्य केल्याचे लिखित स्वरूपात दिले तर मेडिक्लेम, किमान वेतन आणि मानधन वाढ याबाबत आयुक्तांकडे लवकरच चर्चा करू असे सांगण्यात आले.
महानगरपालिका हद्दीतील आशा स्वयंसेविकांना ठरलेल्या कामाव्यतिरिक्त अतिरिक्तकाम करण्याची जबरदस्ती केली जाते, तसेच ऑनलाईन काम करण्याची सक्ती करणे, कामातील वेळेचे बंधन न पाळता अतिरिक्त वेळ काम करण्याची सक्ती करणे, याशिवाय ड्युटीवर असताना लागणारे सुरक्षा कवच न पुरवणे, मानधन ऐवजी पगार देण्यात यावा व सरकारी कर्मचारी दर्जा देऊन सर्व लाभ देण्यात यावेत, कामाचे तास निश्चित करावेत, नियमानुसार सुट्टी व रजा देण्यात यावी, ऑनलाइन काम लादण्यात येऊ नये, इतर कर्मचाऱ्यांची कामे आशा वर्कर यांना लावू नयेत, अधिकृत पालिकेचे ओळखपत्र देण्यात यावे, माता मृत्यू व बाल मृत्यूसाठी फक्त आशा वर्कर यांना जबाबदार धरू नये, सर्व आशा यांचा विमा पालिकेने उतरवावा व सुरक्षिततेची सर्व साधने पुरवावीत याबाबतीतील तक्रारी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्याकडे करण्यात आले होत्या.
याबाबतचे पत्र पालिकेकडे देण्यात आले होते, मात्र तरी देखील कोणतीही कार्यवाही न झाल्याने 12 सप्टेंबर रोजी आशा स्वयंसेविकांनी पालिके विरोधात आंदोलन पुकारले. यात शेकडोंच्या संख्येने आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या. श्रीकांत होवाळ, मनोज रामधरणे, प्रवीण पाटील, आदित्य शिंदे यांच्यासह प्रशांत कांबळे, मधुकर म्हात्रे यांनी या आंदोलनाला मार्गदर्शन केले.