महाविकास आघाडीचा निर्धार
| मुंबई | प्रतिनिधी |
लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर आता आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीची शनिवारी दुपारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी आगामी विधानसभा निवडणूकही महाविकास आघाडी एकजुटीने लढणार असा निर्धार करण्यात आला. देशभक्त आणि लोकशाहीप्रेमी नागरिकांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला आणि देशात इंडिया आघाडीला कौल दिला. पण हा विजय अंतिम नाही, लढाई आता सुरू झाली आहे, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देणार्या महाराष्ट्रातील जनतेचे उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई यांच्यासह आघाडीतील नेते उपस्थित होते.
मोदींमुळे महाराष्ट्रात आघाडीला यश लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश मिळाले, अशी चपकार शरद पवार यांनी यावेळी लगावली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात इतर पक्षांच्या नेत्यांच्या सभा झाल्या. त्यात पंतप्रधानांच्या 18 सभा झाल्या आणि एक रोड शो झाला. त्यांच्या 18 सभा जिथे झाल्या आणि रोड शो ज्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेने फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला, असे सांगत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला. आता विधानसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान जेवढ्या जास्त ठिकाणी भेटीला येतील, तेवढं आम्हाला स्पष्ट बहुमत मिळण्यासाठी अनुकूल वातावरण होईल. त्यामुळे त्यांनाही धन्यवाद देणं हे माझं कर्तव्य समजतो, अशी कोपरखळीही शरद पवार यांनी लगावली.