| अलिबाग | वार्ताहर |
न भूतो न भविष्य असे विविध कला दालनांनी सजलेले आगरी भवन आगरी सामाजिक संस्था, अलिबागच्या वतीने उभे राहणार आहे. ही वास्तू तालुक्यातील आगरी समाजासाठी कौतुकाची आणि वैभवाची असणार आहे, असे प्रतिपादन अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा तथा आगरी सामाजिक संस्था, अलिबागच्या सल्लागार अॅड. मानसी म्हात्रे यांनी केले. गुरुवार, 30 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता खंडाळा इथे आगरी भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा तथा आगरी सामाजिक संस्था, अलिबागच्या सल्लागार अॅड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी संस्था अध्यक्ष कैलास पिंगळे, खंडाळा ग्रामपंचायतीचे सरपंच नासिकेत कावजी, सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ नागावकर, सुभाष म्हात्रे, सुनील म्हात्रे, वारकरी संप्रदायाचे अलिबाग तालुका प्रमुख पद्माकर म्हात्रे, कीर्तनकार जगन्नाथ राऊत, कीर्तनकार जोमा जाखू पाटील, कार्यक्रम प्रमुख गोरखनाथ पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अॅड. मानसी म्हात्रे बोलत होत्या. त्यांनी यावेळी सर्व आगरी समाजाने संस्थेचे अध्यक्ष कैलास पिंगळे यांच्या मागे ठापणे उभे राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात हरिभाऊ पाटील यांनी प्रत्येक समाजांची अलिबाग तालुक्यात भवनं आहेत. आता आगरी भवन सुद्धा अस्तित्वात येईल व दिमाखात उभे राहील, याचा मला अतिव आनंद वाटतो, असे म्हटले. संस्थेचे अध्यक्ष कैलास पिंगळे यांनी आगरी भवनाची गरज आणि त्यासाठी जो ध्यास घेतला याबाबत आगरी भाषेतून उपस्थितांशी संवाद साधला.