जांभळ्या-निळ्या फुलांची पर्यटकांना भुरळ
शिकारी मांसाहारी वनस्पती बहरली
| सुधागड-पाली | वार्ताहर |
सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील विविध पठारांवर फिरताना जांभळ्या-निळ्या रंगाची चिटुकली आकर्षक फुले दृष्टीक्षेपात पडतात. सर्वांचेच लक्ष ही फुले वेधून घेत आहेत. मात्र, ही वनस्पती चक्क शिकारी असून, मांसाहारी आहे. याबाबत अनेकजण अनभिज्ञ आहेत. युट्रीक्युलारीया हे या वनस्पतीचे शास्त्रीय नाव असून, तिला ‘सीतेची आसवे’ म्हणून ओळखले जाते.
या हंगामात सह्याद्रीच्या खडकाळ पठारांवर ही वनस्पती मोठ्या प्रमाणात उगवते, ती अवघी 7 सेंटीमीटर उंचीची असून, अगदी बोटांच्या नखांएवढी लहान मात्र आकर्षक जांभळ्या-निळ्या रंगाची फुले या वनस्पतीला येतात. ही वनस्पती निळी पापणी, जठरी, कावळ्याचे डोळे, कावळ्याचे फूल अशा अनेक जाती आणि नावांनी ओळखली जाते. कोकणात अनेक ठिकाणी तर पर्यटन उद्योग या वनस्पतीच्या उमलण्यावर अवलंबून आहे. गौरीच्या सजावटीमध्ये काही ठिकाणी ही फुलं वापरली जातात. असे वनस्पती व पर्यावरण अभ्यासक शिक्षक राम मुंडे यांनी सांगितले.
अनोखी रचना
कीटकभक्षी वनस्पती म्हटलं की डोळ्यांसमोर चिकट द्रावाचे द्रोण भरलेल्या वनस्पती येतात. पण, ही वनस्पती वेगळी आहे. म्हणजे, या वनस्पतीच्या खोड व मुळांवर सूक्ष्म छिद्र आणि दाट केस असलेल्या पिशव्या असतात. या पिशव्या म्हणजे तिचे जठरच. या पिशव्यांध्ये अतिसूक्ष्म कीटक अडकतात आणि पचवलेसुद्धा जातात.
पोषण मिळण्यासाठी कीटक भक्षण
सह्याद्रीच्या उघड्या खडकावर, कातळावर, जांभ्या दगडाच्या सच्छिद्र दगडांवर ही वनस्पती उगवते. मुळात, पठारावर माती कमी आणि त्यामुळे आवश्यक क्षार, नत्र वगैरेही कमी. ही कमी भरून काढण्यासाठी कीटक भक्षण केले जाते.
मनमोहक व आकर्षक फुले
सुंदर आणि नाजूक फुलं ही या वनस्पतीचा सर्वात सुंदर आणि आकर्षक भाग आहे. काही फुलं जांभळी काही निळी तर काही पांढरी असतात. रंगद्रव्य जितक्या प्रमाणात यानुसार हे रंग दिसतात. वार्यावर डोलणारी ही फुलं डोंगराने जणूकाही जांभळा-निळा शालू पांघरला आहे की काय, अशी भासतात.