रायगड मेडिकल असोसिएशनचा पुढाकार
। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड मेडिकल असोसिएशनची 28 वी दोन दिवसीय परिषद व स्नेहासंमेलन डॉ. निशिगंध आठवले यांच्या अध्यक्षतेखाली अलिबागमधील आर.सी.एफ सभागृहात पार पडली. रायगड जिल्ह्यातील सहाशेहून अधिक डॉक्टर्स रायकॉन 25 या वार्षिक सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. पद्मश्री डॉ. एस. नटराजन आणि पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांच्याबरोबरच भारतातील वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी या परिषदेमध्ये मार्गदर्शन केले.
रायगड मेडिकल असोसिएशन ही संपूर्ण रायगड जिल्ह्यात कार्यरत आहे. असोसिएशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणजे रायकॉन आहे. जिल्ह्यातील अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद व्यासपीठ, युनानी व दंतशल्यचिकित्सा या स्पेशालिटीजचे डॉक्टर्स एकत्र यावे व नवीन काहीतरी शिकायला मिळावे या उद्देशाने रायकॉनचे दरवर्षी आयोजन केले जाते.
यावर्षी 28 वी रायकॉन अलिबागमध्ये घेण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन सरखेल कन्होजी राजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर.सी.एफ.चे व्यवस्थापक नितीन हिरडे, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निशिगंध आठवले, सेक्रेटरी डॉ. राजेंद्र चांदोरकर, खजिनदार डॉ. नवलकिशोर साबू, डॉ. विनीत शिंदे, डॉ. रवींद्र म्हात्रे, डॉ. संजीव शेटकार, डॉ. मयूर कल्याणी, डॉ. किरण जैन, डॉ. गणेश गवळी, डॉ. राजाराम हुलवान, डॉ. एस. एन. तिवारी, डॉ. निखिल जानी, डॉ. कीर्ती साठे, डॉ. विनायक पाटील, डॉ. आशिष भगत, डॉ. संदेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. अमर पाटील यांनी संपादित केलेल्या व जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांची यशोगाथा सादर करणार्या रायकॉन 2025 या पुस्तकाचे प्रकाशनदेखील करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील मागील 50 वर्षे रुग्णांना सेवा देणार्या ज्येष्ठ डॉक्टरांचा आणि मागील 27 वर्षे रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविलेल्या माजी अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला.
एक दिवस स्वतःसाठी या संकल्पनेतून आयोजित केलेल्या संस्कृतिक कार्यक्रमाला सिने अभिनेत्री श्रुती मराठे आणि शेकाप रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी उपस्थिती लावली होती.